तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका स्त्री रूग्णाचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्य़ातील करोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या ४ झाली आहे. त्याचप्रमाणे करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या १२५ झाली आहे.

या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ती महिला मूळची चिपळूण येथील होती. तिकडे नातेवाईक नसल्यामुळे तिला रत्नागिरीत नाचणे येथील नातेवाइकांकडे यावे लागले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. करोनाशी निगडीत लक्षण आढळल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा स्वॅब तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले होता. मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नाचण्यातील त्या कुटुंबातील तेरा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दरम्यान, या मृत महिलेवर अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांनी विरोध केला. यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्य़ातील दोन व्यक्तींना रत्नागिरी स्मशानभूमीत दहन करण्यात आले होते. पण स्थानिकांमध्ये संसर्गाची भीती असल्याने बाधितांचे अंत्यविधी करण्यास विरोध होत आहे. स्थानिकांचा रोष आमच्यावर येऊ  नये, यासाठी आम्ही येथे अंत्यविधी करण्यास विरोध केल्याचे नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी सांगितले.

रत्नागिरी पालिकेने रत्नागिरी शहर आणि परिसरातील क रोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शहरातील चर्मालय येथील स्मशानभुमीत स्वतंत्र गर्डर तयार केला आहे.