शहरातील कुसुमाग्रज स्मारक येथे २४ मार्चपासून चौथ्या मराठी ई-साहित्य संमेलनास सुरुवात होत असून संमेलनाचे अध्यक्षपद कविवर्य ना. धों. महानोर भूषविणार आहेत, तर संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ‘युनिक फीचर्स’ आणि ‘अनुभव’ मासिक यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचा उद्घाटन सोहळा सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमात कवी प्रकाश होळकर हे महानोर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या संमेलनात मुलाखत, चर्चा, गप्पा, कविसंमेलन, मुक्त कट्टा अशा विविध गोष्टी लिखित मजकुरांबरोबर दृक्-श्राव्य माध्यमाच्या स्वरूपात संमेलनात राहणार आहेत. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, दुसऱ्याचे कवी ग्रेस, तर तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी भूषविले आहे. चौथ्या संमेलनात अध्यक्षपदी कविवर्य महानोर असल्याने रसिकांना काव्य मैफलच भरल्याचा अनुभव येईल. रसिकांना या संमेलनाचा घरबसल्या आनंद घेता येणार असून त्यात सहभागीही होता येणार आहे. मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या लेखक-कवींचा माहिती स्वरूपात संग्रह हा गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेला उपक्रम होय. या संमेलनातही दहा दिवंगत ज्येष्ठ लेखक-कवींच्या माहितीचा संग्रह केला जाणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये तो उपलब्ध असणार आहे. समकालीन साहित्यावर निखळ चर्चा व्हावी, चर्चेत वाचकांचा थेट सहभाग असावा, विचार आणि अनुभवाचे आदानप्रदान व्हावे, तरुण वर्गाला त्यांच्या माध्यमातून मराठी साहित्याकडे पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.