लोकसभा मतदारसंघनिहाय घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतल्या अंतर्गत दुफळीचा पाढा पक्षनेते शरद पवार यांच्यासमोर वाचण्यात आला. अर्थात मुख्य बठकीनंतर स्वतंत्रपणे परभणी लोकसभा मतदारसंघाची चर्चा झाली. राज्यमंत्री श्रीमती खान यांनी आपले काम केले नाही यावर उमेदवार विजय भांबळे ठाम राहिले, तर हे आपल्या विरुद्ध रचण्यात आलेले षड्यंत्र आहे, असा खुलासा श्रीमती खान यांनी पक्षनेतृत्वाकडे केला.
मुंबईत शरद पवारांनी सर्व लोकसभा मतदारसंघाची शनिवारी आढावा बठक घेतली. या बठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सुरुवातीला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि मंत्री अशी संयुक्त बठक पार पडली. या बठकीत सर्व लोकसभा मतदारसंघांप्रमाणेच परभणीचीही चर्चा झाली. या बठकीनंतर स्वतंत्रपणे पवारांनी परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. यावेळी श्रीमती खान, भांबळे हे दोघेही उपस्थित होते. श्रीमती खान यांनी आपल्या विरोधात त्यांच्याच एका कार्यकर्त्यांला भारिपच्या वतीने निवडणूक लढवायला लावली. आपल्या विरोधात काम केले, असे पवारांसमोर भांबळे यांनी सांगितले.
श्रीमती खान यांच्या वतीने वर्तमानपत्रांची कात्रणे, हजेरी लावलेल्या बठकांची छायाचित्रे आदींसह काही कार्यकर्त्यांचे खुलासे पक्षनेतृत्वासमोर मांडण्यात आले. आपण प्रामाणिकपणे भांबळे यांचे काम केले आहे, असा खुलासा श्रीमती खान यांच्या वतीने करण्यात आला. आपण चांगले काम करूनही आपल्याला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब म्हणजे आपल्या विरोधातील षड्यंत्र आहे. मंत्रिपदावर डोळा ठेवून आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने आपल्याविषयी या पद्धतीने चुकीची माहिती दिली जात आहे. आपली विधान परिषदेची मुदत संपल्याने अल्पसंख्य म्हणून आपल्या जागेवर आमदार दुर्राणी हे प्रयत्न करीत असून आपल्या विरोधात त्यांच्या वतीने हे कारस्थान रचण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने ज्यांना नोटिसा बजावल्या त्यापकी केवळ विजय वरपुडकर यांचाच खुलासा पक्षाकडे आला. बठकीला उपस्थित असलेल्या श्रीमती खान यांनी लेखी स्वरूपात आपली भूमिका मांडली. माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी पक्षाने दिलेल्या नोटिशीला उत्तर दिले नाही.