सांगली : पाण्याच्या शोधात भटकत असताना ६० फूट खोल विहिरीत गेली चार दिवस अडकलेल्या कोल्ह्यच्या पिलाला राहत, प्राणी मित्रांनी सुखरूपपणे बाहेर काढून अधिवासात मुक्त केले. बुधवारी चार तास कोल्हा बचाव मोहीम फत्ते केल्यानंतर अल्पशी क्षुधाशांती होताच या पिलाने अधिवासात धूम ठोकली.

आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील गणेश घाटके यांच्या शेतातील ६० फूट खोल विहिरीत पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना कोल्ह्य़ाचे एक पिलू चार दिवसांपासून वर येता येत नसल्याने अडकले होते. विहिरीला पायऱ्या नसल्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्नही कठीण होते. विहीर मालक घाटके यांनी ही माहिती वनविभाग आणि प्राणी मित्र विजय पाटील यांना कळविली. सर्प मित्र विजय पाटील, एकनाथ मोरे यांनी घटना स्थळी जाऊन कोल्ह्यला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांच्याकडे कोणतेही साधने नसल्याने त्यांना अपयश आले, त्यांनी सदर घटना वनक्षेत्रपाल मनोज कोळी यांना कळवली त्यांनी कोल्ह्य़ाला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती अ‍ॅनिमल राहत यांना केली.

अ‍ॅनिमल राहतचे डॉ. नरसिंग कुंभार, किरण नाईक, दिलीप शिंगाणा, सागर भानुसे, कौस्तुभ पोळ तसेच वनरक्षक कोळेकर हे घटनास्थळी पोहोचले.  बुधवारी बचाव पथकातील दिलीप शिंगाणा यांना आधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करून ६० फूट खोल विहिरीत उतरवण्यात आले.  त्यांनी अत्यंत अवघड परिस्थितीत त्या कोल्ह्यला डॉग कॅचिंग नेटमध्ये पकडले. वरील इतर सर्वानी कोल्ह्यला विहिरीतून दोरीच्या साहाय्याने वरती घेतले.

अ‍ॅनिमल राहतचे डॉ.नरसिंग कुंभार यांनी कोल्ह्यची तपासणी केली. सुदैवाने तो कोल्ह्यला ६० फूट खोल पाण्यात पडल्याने कोणतीही इजा झाली नव्हती, तसेच पाण्यापासून थोडे वर बसण्यास कोरडी जागा होती तिथे तो बसला होता. उपाशी आणि भेदरलेला होता. कोल्ह्यला विहिरीतून वर काढण्यासाठी चार तास अथक प्रयत्न सर्वाना करावे लागले. विहिरीतून वर काढल्यावर त्यास, खायला तसेच पाणी देण्यात आले व थोडी विश्रांती घेतल्यावर त्याने निसर्गात धाव घेतली.