राज्य सरकार आणि फॉक्सकॉन यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री, उद्योग मंत्रालय आणि फॉक्सकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फॉक्सकॉन कंपनी पुण्यातील तळेगाव येथे स्वत:चा उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पात आयफोन ,आयपॅड व आयपॉड या जगप्रसिद्ध उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय, ब्लॅकबेरी, अॅपल, एक्सबॉक्स, किंडल यांसारख्या मातब्बर कंपन्यांसाठी याठिकाणी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पासाठी कंपनी तब्बल ३५,००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याने येत्या काळात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तैवानस्थित फॉक्सकॉनचा एक प्रकल्प याअगोदरपासूनच भारतात कार्यरत आहे. मात्र, कंपनीचे बहुतेक उत्पादन हे चीनमध्येच असते. परंतु, गेल्या काही काळात चीनची अर्थ व निर्मितीस्थिती लक्षात घेता कंपनी आपल्या प्रकल्पासाठी अन्य ठिकाणांच्या शोधात होती. आयफोनबरोबर स्पर्धा असलेल्या कोरियन कंपनी सॅमसंगचा सध्या उत्तर भारतात मोबाईल उत्पादन प्रकल्प आहे.