फ्रान्सच्या मदतीने भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’करण्यात येणार असून, त्यात नागपूरचा समावेश आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये १७ करार करण्यात आले. त्यात नागपूरसह भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नागपूरचा विचार केला आहे. शहराच्या प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्यापूर्वी चाचपणी करण्याच्या दृष्टीने शहराच्या विविध प्रकल्प आणि विकास कामांची माहिती घेण्यासाठी गेल्या महिन्यात फ्रेंच विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने नागपूरला भेट दिली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने कुठल्या योजना राबवल्या जात आहे याची माहिती त्यांनी घेतली होती. याशिवाय जेएनएनयूआरएमतंर्गत पेच टप्पा १,२,३,४ आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, नाग नदी आणि पिवळी नदी स्वच्छता मोहीम, शहर बस वाहतूक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बीएसयूपी (राजीव गांधी योजना) या प्रकल्पांची माहिती त्यांनी घेतली. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने जे निकष आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाला सांगितले होते. महापौर प्रवीण दटके  यांनी गेल्या महिन्यात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला होता आणि त्या संदर्भात चर्चा केली होती. या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी म्हणून फ्रान्स सरकारचे जे निकष आहे त्या संदर्भातील प्रस्ताव महापौरांनी यापूर्वीच केंद्र सरकारला दिला आहे. शिवाय फ्रान्सचे शिष्टमंडळ नागपुरात आले असताना त्यांना विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. फ्रान्स सरकारचे जे निकष आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात राबवण्यात येणारी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, कचऱ्यांचे व्यवस्थापन, लोकसहभागातून स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, गरिबांना घरे या सर्व विषयांबाबत प्रस्ताव केंद्र शासनाला दिला होता. राज्य सरकारला नागपूर शहर विकसित करण्याच्या दृष्टीने पत्र दिले होते त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल. स्मार्ट सिटी म्हणून फ्रान्स सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील लोकांची आणि प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. याबाबत महापौर प्रवीण दटके म्हणाले, दोन वेळा फ्रान्स सरकारचे प्रतिनिधी नागपुरात येऊन गेले. त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाहणी केली होती. राज्य शासनाला पत्र दिले होते. स्मार्ट सिटी म्हणून फ्रान्स सरकारच्या काय योजना आहेत ते चर्चेनंतर ठरवले जाणार आहे.