24 January 2020

News Flash

भाजीपाल्यापेक्षा चाफा लागवड शेतकऱ्यांसाठी किफायतशीर

चाफ्याचे रोप लावल्यानंतर ९ ते १० महिन्यांनंतर या रोपाला बहर येऊ  लागतो.

पालघरमधील शेतकऱ्यांकडून चाफ्याची लागवड केली जात आहे.

वर्षभरात पाच ते आठ लाखांचा फायदा; भाज्यांना रोगराईचे ग्रहण

नीरज राऊत, पालघर

पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतून मुंबईच्या बाजारपेठेत दररोज दोन ते सव्वादोन लाख चाफ्याच्या फुलांची आवक होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षांकाठी पाच ते आठ लाखांचा नफा मिळत आहे. भाजीपाला लागवडीला रोगराईचा फटका बसत असल्याने चाफा फुलांची लागवड भाजीपाल्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरत आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकरी चाफा लागवडीकडे वळू लागले आहे. १५०-२०० रुपयांमध्ये चाफ्याचे कलम मिळत असून जागेची मशागत करणे, त्यामध्ये ड्रीप आणि स्प्रिंकलरची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी प्रत्येक कलमासाठी सुमारे १०० रुपयांचा खर्च येतो. त्याशिवाय कीटकनाशक फवारणी, खत आणि पाणी देण्याच्या नैमित्तिक खर्च सोबतीने कळ्या वेचण्याची मजुरी, पॅकिंग तसेच फुले मुंबईला पाठवणे हा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. घाऊक बाजारात शेकडा ४० ते ६० रुपये दर मिळत असून किरकोळ बाजारात एक रुपया एक फूल तसेच चाफ्याच्या गजऱ्याला ६० रुपये दर मिळतो.

चाफ्याचे रोप लावल्यानंतर ९ ते १० महिन्यांनंतर या रोपाला बहर येऊ  लागतो. चाफ्याच्या रोपटय़ाला पहिल्या तीन ते चार वर्षांत चांगल्या प्रकारे फुले येत असल्याचे दिसून येते आणि त्यानंतरच्या काळात झाडाची उंची मर्यादित ठेवण्यासाठी झाडांची छाटणी कौशल्यपूर्ण पद्धतीने करणे आवश्यक असते. झाडांवर कीटकनाशकाची फवारणी त्याचप्रमाणे खतांची मात्रा नियंत्रित पद्धतीने दिल्यास प्रत्येक झाडातून हंगामामध्ये प्रतिदिन दहा ते वीस फुले उमलताना दिसतात.

मार्च महिन्यापासून वाढणाऱ्या उन्हापासून या झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून नियमित पाणी देण्यासोबत स्पिंकलरद्वारे पाण्याची फवारणी करणे आवश्यक असते. सकाळी सहा वाजता बागेतील कामगार ही फुले वेचण्यास सुरू करतात आणि सकाळी आठ ते नऊ  वाजेपर्यंत या फुलांची वेचणी आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्यांना दादपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू होते. चाफ्याचे फूल थंडाव्यात किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा सुगंध दोन दिवसांपर्यंत कायम राहतो.

उन्हाळी भात पिकाला आवश्यक दर लाभत नाही, तसेच या पिकासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता जिल्ह्यातील अनेक भागांत जाणवते. दुसरीकडे मिरची, काकडी, कारली यांसारख्या भाजीपाला पिकांना विषाणूने ग्रासल्याने या पिकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये मर्यादित मनुष्यबळात आणि स्वत: देखरेख केल्यास सोनचाफ्याची लागवड ही भाजीपाला उत्पादनापेक्षा किफायतशीर ठरत असल्याचे कमारे येथील शेतकरी विनय राऊत यांनी सांगितले.

शिक्षक ते चाफा बागायतदार

पालघर येथील कृषी पदवीधर विनय राऊत यांनी शिक्षकी पेशासोबतच चाफ्याची २५ कलमे लागवडीकरिता आणली. ही कलमे मोठी झाल्यानंतर त्यापासून इतर कलमे तयार करून त्यांनी सुरू केलेल्या नर्सरीच्या माध्यमातून कलमांची विक्री केली जाते. सोनचाफा फुलाबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाल्याने तसेच त्याच्या बागायतीने चांगले उत्पन्न मिळेल याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आपल्या बागेत असलेली चिकू व नारळ यांची लागवड काढून टाकून त्या ठिकाणी २०१० पासून चाफ्याची लागवड केली. या क्षेत्रात १५०० कलमांची लागवड केली असून आठ ते दहा कामगारांच्या माध्यमातून सकाळच्या प्रहरी फुले वेचणे तर सायंकाळी झाडांची मशागत करणे असे काम नित्याने ते करत आहेत. वेचलेली फुले शेकडय़ाच्या प्रतीने बांधून ती दादर येथे पाठवण्यास तारांबळ उडत असल्याचे ते सांगतात, तरीदेखील या लागवडीतून वर्षांकाठी अधिक उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. चाफ्याच्या झाडावर योग्य निगराणी ठेवल्यास, त्याची छाटणी आणि मशागत नियमित केल्यास भाजीपाला उत्पन्नापेक्षा त्यामधून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत असल्याचे विनय राऊत यांनी सांगितले.

First Published on April 24, 2019 3:05 am

Web Title: frangipani flower planting is beneficial for farmers
Next Stories
1 जनावरांच्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचीही पथारी!
2 उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स
3 सांगलीने जागवली अफवांची रात्र!
Just Now!
X