ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. डी. एस. कुलकर्णी हे फिट असून आता त्यांची चौकशी करता येईल, असा अहवाल डॉक्टरांनी न्यायालयात सादर केला आहे.

फसवणुकीप्रकरणी डी एस कुलकर्णींना गेल्या आठवड्यात दिल्लीतून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. फरासखाना पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेले डीएसके शनिवारी रात्री चक्कर येऊन कोसळले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डीएसकेंना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याची मागणी वकिलांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यानंतर डीएसकेंना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी डीएसकेंना पुन्हा एकदा ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सर्व तपासणी केल्यानंतर न्यायालयात अहवाल सादर केला. ‘डीएसके यांची प्रकृती उत्तम असून आता त्यांची पोलीस चौकशी करता येईल, असा अहवाल डॉक्टरांनी रुग्णालयात दिला आहे. आता न्यायालय डीएसकेंबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी डीएसके यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने डी एस कुलकर्णींना व त्यांच्या पत्नीला १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.