रत्नागिरी :  देवरूख-कांजिवरा येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चार अज्ञातांनी नुरुल होदा मशहुरअली सिद्दीकी यांच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास  सिद्दीकी यांच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्यासह पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने बेडरुममधील कपाटे   स्क्रू ड्रायव्हरने उघडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल हॅण्डसेट मिळून ५ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लुबाडला. त्यानंतर सिद्दीकी व त्यांचा भाचा असाद उल्ला या दोघांच्या तोंडाला प्लास्टिक टेप गुंडाळून सर्वांचे हात नायलॉनच्या दोरीने बांधले. सिद्दीकी यांचे मोबाईल घराबाहेर टाकून चोरटे मोटारीतून पसार झाले. त्यापूर्वी, दोन दिवसांत आम्हाला पाच कोटी रुपये पाहिजेत, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार करू, अशी धमकीही चार अनोळखी व्यक्तींनी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश कानडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी घटनास्थळी भेट दिली. रत्नागिरी येथून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञही दाखल झाले होते. श्वानपथक बंगला परिसरातच घुटमळले, तर ठसे तज्ञांचा अहवाल येणे बाकी आहे.

गुन्हा घडलेले ठिकाण देवरूख-साखरपा राज्य मार्गालगत असलेला वर्दळीचा भाग आहे. हमरस्त्याशेजारी असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिद्दीकी भंगार व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिल्लक भंगार कोल्हापूरला विकल्याची चर्चा सुरू आहे. यातून आलेली रोख रक्कम त्यांच्या घरात असावी आणि माहितगाराने हे कृत्य केले असावे, अशीही चर्चा होती. पोलीस निरीक्षक मारुती जगताप पुढील तपास करत आहेत.