News Flash

पत वाढवण्यासाठी ठेकेदारासह अधिकाऱ्यांचा सहभाग?

जव्हार, मोखाडा तालुक्यातील गाव-पाडय़ांतील नळपाणी योजना फसवणूक प्रकरण

जव्हार, मोखाडा तालुक्यातील गाव-पाडय़ांतील नळपाणी योजना फसवणूक प्रकरण

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : जव्हार तसेच मोखाडा तालुक्यातील मौजे कल्लाळे, मौजे गोमघर आणि तीन पाडे  आणि  मौजे चास ठाकूरपाडा येथील नळपाणी पुरवठा कामाच्या ई-निविदा सादर करताना मितेश पारेख या ठेकेदाराने जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत आकरे यांच्या लेटरहेडवर खोटा अनुभव दाखला सादर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उप अभियंता उपविभाग जव्हार यांच्या अहवालानंतर स्पष्ट होते आहे. ठेकादाराची ई-निवेदेसाठी तांत्रिक पात्रता सिद्ध  करताना पाणी पुरवठा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार असल्याबाबत आमदार आनंद ठाकूर यांनी अवर मुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र ब. बारभुवन यांनी लक्ष घातल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

मौजे किनिस्ते नळपाणी पुरवठा योजनेच्या ई निविदेसाठी  मितेश पारेख रा.नाशिक या ठेकेदारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नोंदणी नुसार १५ लाखापर्यंत काम करण्याची क्षमता आहे. त्यांना कामाचा अनुभव नसल्याने किनिस्ते नळपाणी योजनेत मितेश पारेख  या ठेकेदारास तांत्रिक मुल्यांकनात बाद ठरवण्यात आले होते.त्यानंतर या ठेकेदारास सुधारित तुलात्मक तक्त्यानुसार  निविदेस  पात्र ठरवुन निविदेत अनियमितता झाल्याप्रकरणी स्पर्धक ठेकेदारांनी आमदार आनंद ठाकूर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले.याप्रकरणी  दिनांक २३ डिसेंबर २०१९ च्या जिल्हा परिषद पालघर यांच्या पत्राच्या अनुषंगाने ३१ डिसेबर २०१९  रोजी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जव्हार यांच्याकडून  पंचनामा करण्यात आला आहे.सदरची बाब गंभीर असुन जिल्हा परिषदेची फसवणुक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पाणी पुरवठा विभागाचे अनेक ई निवीदा प्रसिद्ध होत असतात. त्यात ठेकेदाराची पुर्व पात्रता समावेश असतो.काही कामांच्या बाबतीत पाणी पुरवठा विभागाने ठेकेदाराची पात्रता ठरविताना अनियमितता केल्याचे उघड झाले आहे.विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकुर यांनी २३ जुलै २०१९ रोजी पाणी पुरवठा विभागचे अवर सचिव यांना लेखी कळविले आहे.त्यांनंतर शासनाचे अवर सचिव आ.म.लुडबे यांनी दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार महेंद्र वारभुवन यांनी संपुर्ण चौकशी केल्याअंती निविदेत दाखल केलेले कामांचे दाखले बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कौलाळे नळ पाणी पुरवठा योजना ता.जव्हार ७४ लाख,चास ठाकुरपाडा नळ पाणी पुरवठा योजना ता.मोखाडा ५५ लाख,गोमघर नळ पाणी पुरवठा योजना मोखाडा ८१ लाख किनिस्ते नळ पाणी पुरवठा योजना ता.मोखडा ८४ लाख इत्यादी कामे मितेश जितेद्र पारेख या एजंसीला देण्यात आली आहेत.पण प्रत्यक्षात मात्र त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कामे घेण्याचे नोंदणी मात्र पंधरा लाखांचीच होती. तरीही त्यास एकाच वेळी तीन कोटींचे कामांची ई टेंडर मंजुर केली आहेत.त्यातही कामे केल्याची दाखलेही बोगस जोडले असल्याचे समोर आले आहेत.याबाबतीत महेंद्र वारभुवन यांनी त्या ठेकेदारास १२ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी नोटीस दिली आहे. पंचनाम्यामध्ये हा दाखला बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे.या प्रकरणी गौतम बल्लाप्पा कांबळे सहाय्यक लेखाधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या खुलाशात गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

मौजे आकरे येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीने एकही नळपाणी योजना राबवलेली नाही. ग्रामपंचायत अनुभव दाखला देऊ  शकत नाही. संबधित प्रकरणाची चौकशी होऊन अहवालही सादर झाला. ठेकेदाराने ग्रामपंचायतचे लेटर हेड, सही शिक्का कुठून मिळवल्याची चौकशी करणे गरजेचे आहे. -रूपसिंग वळवी,  ग्रामसेवक आकरे मी महिनाभर प्रशिक्षणासाठी रजेवर होतो. कार्यालयातील कागद पत्र पाहुन माहीती देता येईल.

-महेंद्र बारभुवन  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर

माझ्या नावाची बदनामी सुरु आहे. पहिल्या निविदेला माझ्याकडे १५ लाखांचा परवाना होता. तेव्हा माझी निविदा बाद ठरविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या निविदेच्या वेळी माझ्याकडे १५ कोटीचे परवाना घेऊन मी निविदा भरली.ग्रामपंचायतीच अनुभवाचे दाखले त्यांचेच आहेत. दबावाखाली येऊन ग्रामपंचायतीने अहवाल बदलला.

-मितेश पारेख ठेकेदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:03 am

Web Title: fraud detected in water pipeline work in jawhar taluka zws 70
Next Stories
1 ‘करोना’चं सत्य
2 अर्थकारणातून कत्तलखान्यावर कारवाई नाही?
3 Coronavirus : प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मास्क पुरवण्याचे आदेश
Just Now!
X