सोलापूर महानगरपालिकेमार्फत दारिद्रय़रेषेखालील कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुवर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेत १५ वर्षांपूर्वी वटलेल्या धनादेशांच्या क्रमांकाचा वापर करून २६ लाख १० हजारांचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बाराजणांविरूध्द महापालिकेच्यावतीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
महापालिकेत गेल्या ३१ मार्चपासून सुवर्ण जयंती योजना बंद आहे. बँक ऑफ इंडियाच्या नीलमनगर शाखेत महापालिकेच्या खात्यावरील रक्कम नवीन राष्ट्रीय नागरी जीवनन्नोती योजनेत वर्ग करण्यासाठी महापालिकेच्या नागरी समुदाय विकास प्रकल्पाचे संचालक लक्ष्मण बाके हे गेले असता हा घोटाळा दिसून आला. याप्रकरणी पालिकेच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैय्याज नसरूद्दीन पठाण (रा. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी मार्ग, बार्शी), हमजुद्दीन मसूद मुजावर (रा. मांजरी, ता. सांगोला) व अजहद खाजाभाई शेख (भीमानगर, ता. माढा) यांच्या बँक ऑफ इंडियातील खात्यावर २६ लाख १० हजार ९५० रुपये गेल्या ऑक्टोबर महिन्यात वटले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या शाखेत १९९८-९९ मध्ये वटविण्यात आलेल्या धनादेशावरील जुनेच क्रमांक पुन्हा वापरून बनावट धनादेश वापरून सुवर्ण जयंती योजनेतील रक्कम हडपण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फैय्याज पठाण, हमजुद्दीन मुजावर व अजहद शेख यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे प्रशांत मोरेश्वर पाठक ( सांगोला शाखा व्यवस्थापक), अशोक महादेव कावडे (बार्शी शाखा व्यवस्थापक), तानाजी राजाराम शिंदे (टेंभुर्णी शाखा व्यवस्थापक), उत्पलकांत (पासिंग अधिकारी, सांगोला शाखा), चंदनकुमार (पासिंग अधिकारी, बार्शी शाखा), नेल्सन बास्के (नगदी अधिकारी, बार्शी शाखा), गणेश रोकडे (नगदी अधिकारी, टेंभुर्णी शाखा) यांच्यावर संगनमत करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची शून्य क्रमांकाने नोंद होऊन तो नंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.