सरकारच्या पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सदर करून पीक कर्ज मंजूर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी म्हालसवडे येथील एकाच कुटुंबातील सहा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आणखी ४०० लोकांना नोटीसा पाठवल्या आहेत. या प्रकरणाची व्याप्ती ८ कोटींच्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित राजाराम पाटील, त्यांची पत्नी राणीताई, त्यांची मुले सचिन आणि सुमित पाटील, सून सुमन सचिन पाटील, रेश्मा सुमित पाटील (सर्व रा. म्हालसवडे, ता. करवीर) या कुटुंबावर पीक कर्ज योजनेसाठी खोटी कागदपत्रे दाखल केल्याचा आरोप आहे. या आरोपींनी २७ आक्टोबर २०१६ ते ३ आक्टोबर २०१८ या कालावधीत वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेत पीक व पाईपलाईन कर्ज मिळण्याकरिता गावातील लोकांचे अर्ज दिले. बँकेकडे २२ लाख ४४ हजार रुपये कर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मंजूर करुन घेतले.

मात्र, बँकेचे शाखाधिकारी सचिन सुरेश शेणवी यांना संशय आल्याने त्यांनी करवीर तहसीलदारांना पत्र पाठवले. या पत्रात कर्ज प्रकरणासोबत सादर केलेले उतारे मूळ गावातील अभिलेखांशी जुळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तपासानंतर संबंधीतांनी बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

बँकेचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

फसवणुकीचा आकडा लाखाच्या घरात असला तरी सुमारे आठ कोटींची फसवणूक झाल्याचा संशय आहे. यामध्ये ४00 आरोपींचा समावेश आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण खात्री न करता प्रकरणे मंजूर कशी केली, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. फसवणुकीची व्याप्ती आणि रॅकेट मोठे असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.