महा ई सेंटरच्या नावाने देशभर फसवणूक करणाऱ्या भामट्याला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. या भामट्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांत ७० ते ८० लोकांची फसवणूक केली आहे. शेखर ओमप्रकाश पोद्दार असे या भामट्याचे नाव आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याला नागपूरमधून अटक केली.

देशातील अनेक राज्यात या शेखर विरोधात गुन्हे दाखल आहेत. आधारकार्ड, बस, रेल्वे, विमान प्रवासाची ई तिकीटे यांसारख्या सुविधांचे मेसेज शेखर लोकांना पाठवत असे. या सुविधा देण्याचे सांगून पैसे लुटत असे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यात राहणाऱ्या रमेश कुलकर्णी यांच्यासोबतही असाच प्रकार घडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण सायबर सेलकडे वर्ग केले. शेखरने फसवलेल्या लोकांच्या प्रकरणांचा पोलिसांनी बारकाईने तपास केला. त्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस करून त्याला नागपूरमधून अटक केली. वेबसाईटचा वापर करत महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतील लोकांनाही या भामट्याने फसवलं होतं. आता पोलीस त्याची बारकाईने चौकशी करत आहेत.