संतोष मासोळे

करोना विषाणूमुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला असताना दुसरीकडे कमी झालेले ध्वनी आणि वायुप्रदूषण पक्षी- प्राण्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. संचारबंदीत वाहने, माणसांचा वावर कमी झाला आहे. निर्मनुष्य रस्ते, परिसरामुळे दुरावलेले मोर शहर, गावालगतच्या परिसरात येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, संचारबंदीच्या काळात एकही वन्यजीव आणि पक्षी जखमी किंवा मृतावस्थेत आढळलेला नाही. काही दिवसांपासून पशू चिकित्सालयात ही संख्या शून्य आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आल्यावर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व आस्थापना, कारखाने आणि वाहतूक बंद आहे. करोनाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. बाजारपेठा, रस्ते, महामार्ग, गावातील पार अशा सर्व ठिकाणची गर्दी ओसरली. कारखान्यांमधून बाहेर पडणारे धुराचे लोळ थांबले. यंत्रांचा आवाज बंद झाला. रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे प्रदूषण थांबले.

कधीही न अनुभवलेले असे निर्धास्त वातावरण पक्षी सध्या अनुभवत आहेत. शहर, जंगलात तसेच भक्ष्य शोधण्यासाठी विशिष्ट जलाशयांजवळ स्थिरावणाऱ्या पक्ष्यांचे थवे आता मुक्त संचार करीत असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासक डॉ. प्रदीप व्यवहारे यांनी नोंदविले. पक्ष्यांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. प्रदूषण कमालीचे घटल्याने हा बदल दिसतो. आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांसाठी जणू हा पर्वणीचा काळ आहे.

पूर्वी शहरालगत असलेल्या बोरविहीर, लळिंग या गावांच्या परिसरातील जंगलात मोर दिसायचे. आता अनेक ठिकाणी निर्मनुष्य महामार्ग किंवा रस्ते आणि गावांत, झाडांवर किंवा इमारतींवर मोर दिसतात. वाहने, माणसांचा वावर कमी झाला. पक्षी आणि प्राण्यांना खऱ्या अर्थाने नैसर्गिक सान्निध्य लाभल्याचे अभ्यासकांना वाटते. शहरांमधून चिमण्या कधीच गायब झाल्या आहेत. काही वर्षांत त्यांनी ग्रामीण भागात अधिवास शोधला. मातीची घरे किंवा शांतता असलेल्या गोदामांसारख्या सुरक्षित जागी चिमण्यांची घरटी दिसतात. सद्य:स्थितीत त्याही शांतता अनुभवत आहेत.

सध्याचा काळ परदेशी पक्षी परतण्याचा आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत हे पक्षी आपापल्या प्रदेशात पोहोचतील. सध्या काही नवीन पक्षी दिसलेच तर ते केवळ प्रदूषण कमी झाल्यामुळे दिसले, असे समजण्यास वाव आहे. असे वातावरण कायम राहणार नाही. कालांतराने पुन्हा देशभर यंत्रांची धडधड, रस्त्यावरील वर्दळ सुरू होईल. परंतु सध्या प्राणी, पक्ष्यांसाठी सुवर्णकाळ असल्याकडे डॉ. व्यवहारे यांनी लक्ष वेधले.

वन्यजीवप्रेमी किरण कांबळे यांनी देशभर संचारबंदीची ही पहिलीच वेळ असल्याने विशिष्ट वन्यजीवांवर याचा नेमका काय परिणाम झाला याची पाहणी झालेली नसल्याचे नमूद केले. परंतु, ध्वनी, वायुप्रदूषण आणि मानवी धोके कमी झाल्याने वन्यजीवांना मोकळीक मिळाल्याचे कांबळे म्हणाले.

संचारबंदीत एकही वन्यजीव किंवा पक्षी जखमी वा मृतावस्थेत आढळलेला नाही. काही दिवसांपासून चिकित्सालयात ही संख्या निरंक आहे. अन्यथा रस्ते अपघातातील मृत किंवा जखमी अवस्थेतील बिबटय़ा, मोर, साळिंदर यांसारख्या वन्यजीवांना चिकित्सालयात वन्यजीवप्रेमी आणत असतात.

– डॉ. पी. जी. कोमलवार, पशुसंवर्धन अधिकारी, धुळे</p>