मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने खास योजना केली असून, खेडय़ातील मुलींना शिक्षणासाठी शहरात जाणे सुकर व्हावे, या साठी निळय़ा रंगाच्या विनामूल्य बसेस सुरू केल्या आहेत.
ग्रामीण भागातील मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवताना पालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मुलींना एकटीला शाळेत पाठविताना पालकांच्या मनात धाकधूक असते. तिला प्रवासात अडचण होऊ नये, या साठी सरकारने एस. टी. महामंडळातर्फे मुलींसाठी बसेसची सोय केली आहे. यात मुलींसाठी पूर्ण मोफत सेवा आहे. शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी व गावी येण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे. राज्यभरात सुमारे ६०० गाडय़ा या योजनेंतर्गत धावतील. महामंडळाच्या नवीन धोरणामुळे मुलींना चांगला लाभ होणार आहे.
महामंडळाला थोडा आíथक तोटा सहन करावा लागला, तरी राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे भवितव्य घडणार असल्यामुळे या योजनेवर अधिक भर दिला असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे म्हणणे आहे. सरकारने या योजनेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला १०२ कोटींचा निधी दिला असून, ज्या जिल्हय़ात मानव विकास निर्देशांक कमी आहे, अशा जिल्हय़ासाठीच ही विशेष योजना राबवणार आहे.