News Flash

लोकसहभागातून प्राणवायू!

केवळ करोनाबाधितच नव्हे, तर श्वसनाचे आजार असलेल्या इतर रुग्णांसाठीही उपयुक्त

लोकसहभागातून प्राणवायू!
(संग्रहित छायाचित्र)

‘करोना’चा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवर प्राणवायूची सुविधा तातडीने देण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ यंत्र मोफत पुरवण्याची योजना कुडाळ येथील विनय सामंत लोकसहभागातून यशस्वीपणे राबवत असून ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांसाठी तो आधार ठरत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोना साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असताना सामंत यांनी, हे यंत्र स्वत: विकत घेऊन गरजूंना मोफत पुरवण्याची योजना सुरू केली. तसेच इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रकारची ६-७ यंत्रे उपलब्ध झाली आहेत. केवळ करोनाबाधितच नव्हे, तर श्वसनाचे आजार असलेल्या इतर रुग्णांसाठीही ती उपयुक्त ठरत आहेत.

वैद्यकीय सुविधेचा अभाव असलेल्या ठिकाणी हे यंत्र गंभीर आजारी रुग्णांना मोठा आधार ठरू शकते, असे मत व्यक्त करून सामंत म्हणाले की, करोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अशा आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या परिणामकारक पर्यायाची नितांत गरज आहे. गेल्याच मंगळवारी एका गंभीर करोनाग्रस्त रुग्णासाठी हे यंत्र जीवनदायी ठरले. शासकीय पातळीवरून घाऊक प्रमाणात त्याची खरेदी करून वाटप झाले तर हा पर्याय सर्वदूर उपलब्ध होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल. पण त्याची वाट न बघता काही व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांनी ते मोफत उपलब्ध करून दिले तर त्यातून स्थानिक पातळीवर वेगळ्या प्रकारची आरोग्य सुविधा निर्माण होऊ शकेल. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांमधील गृहरचना संस्थाही आपल्या सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

हे यंत्र हवेतील प्राणवायू शोषून घेऊन त्याची घनता सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत वाढवते. त्यामुळे पुनर्भरणाचा खर्च नाही, तसेच त्याची फारशी देखभाल-दुरुस्तीही करावी लागत नाही. एका यंत्राची किंमत सुमारे ४० ते ४५ हजार रुपये असून ते ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:36 am

Web Title: free supply of oxygen concentrator device for immediate supply of oxygen abn 97
Next Stories
1 ‘मरकज’च्या धर्तीवर कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू
2 रुग्णाला दवाखान्यातून हाकलले
3 दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : वनविभागातील भ्रष्टाचाराच्या कथांचेही सूतोवाच
Just Now!
X