ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ कृष्णाजी कदम यांचे शनिवारी वयाच्या १०७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, चार पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाटण तालुक्यातील नाणेगाव बुद्रुकचे सुपुत्र असलेले हरिभाऊ कदम हे गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होते. त्यांनी सन १९३२ मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये क्रियाशील सदस्य म्हणून काम केले होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासह चळवळीत योगदान दिले. या दरम्यान, ते भूमिगत राहिले होते. कोयनेच्या सन १९६७ मधील भूकंपात नाणेगावचे पुनर्वसन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लोकाग्रहाखातर त्यांनी सन १९६७ ते ७२ या कालावधीत पाटण पंचायत समितीचे उपसभापती म्हणून, तर १९७२ ते ७७ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले.