17 December 2017

News Flash

‘वाडा चिरेबंदी’ला फ्रेंच रंगभूमीचे दार खुले

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील नातेसंबंधांविषयी विदेशात प्रचंड आकर्षण आहे.. कुटुंबातील नात्यांची घट्ट वीण भावनिकदृष्टय़ा सर्वत्र

विक्रम हरकरे नागपूर | Updated: December 27, 2012 3:52 AM

नाटय़वाचनानंतर प्रयोगही रंगण्याचे संकेत
भारतीय कुटुंब व्यवस्थेतील नातेसंबंधांविषयी विदेशात प्रचंड आकर्षण आहे.. कुटुंबातील नात्यांची घट्ट वीण भावनिकदृष्टय़ा सर्वत्र सारखीच आहे आणि ही नाजूक नाती जपून ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते .. महेश एलकुंचवारांच्या प्रचंड गाजलेल्या ‘वाडा चिरेबंदी’च्या फ्रेंच भाषेतील नाटय़वाचनाला फ्रान्सच्या रसिक प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद मराठी नाटककाराच्या जबरदस्त लेखणीची किमया होती.. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘वाडा चिरेबंदी’चे प्रयोग फ्रेंच रंगभूमीवरही रंगण्याचे संकेत मिळाले आहेत..
जुन्या काळातील वाडा संस्कृतीत बालपण गेलेल्या महेश एलकुंचवारांच्या लेखणीतून ‘वाडा चिरेबंदी’चे कथानक फुलले आहे. या नाटकातील पात्रांची निवड, त्यांची होणारी घुसमट, वेगळ्या वाटांमुळे होणाऱ्या वेदना, एकत्र कुटुंब व्यवस्थेवरील घाला यातून घडत गेलेली ही कथा नाटय़वाचनातून फ्रेंच रंगभूमीवर प्रवेशली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महेश एलकुंचवारांची नाटके अन्य भारतीय भाषा तसेच इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत भाषांतरित झाली आहेत. सुलतान, होळी, पार्टी, वाडा चिरेबंदी यांचा खास उल्लेख करावा लागेल. असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, बर्मिगहॅम फेलोशिप अशा बहुमानांनी सन्मानित झालेल्या महेश एलकुंचवारांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमधील ‘केली’ या संस्थेतर्फे खास निमंत्रित करण्यात आले आणि ‘वाडा चिरेबंदी’ला फ्रान्समधील रंगभूमीचे दरवाजे खुले झाले..
याची पाश्र्वभूमी रोचक आहे. पॅरिसमधील अ‍ॅनेट लीडे या नर्तिका भारतीय कथकली शिकलेल्या आहेत. बरीच वर्षे त्यांनी कथकली पद्धतीने युरोप आणि  इंग्लंडमध्ये ‘किंग लिअर’चे ‘केली’ या संस्थेतर्फे अनेक प्रयोग केले. परंतु, भारतातील नागरी रंगभूमीविषयी युरोपमध्ये फारशी माहिती नाही, असे त्यांच्या लक्षात आले. यादरम्यान गिरीश कर्नाड यांचे ‘हयवदन’ आणि महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ फ्रान्समध्ये पोहोचले होते. दरम्यान ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाची नाटय़संहिता फ्रेंच भाषेत भाषांतरित करण्याचे गेरडी गेरशायमर्द आणि माधुरी पुरंदरे यांनी ठरवले. आर्ल येथे झालेल्या कार्यशाळेत त्यांनी गेल्या जुलैमध्ये नाटय़संहितेच्या फ्रेंच भाषांतरावर अंतिम हात फिरवला आणि ‘वाडा चिरेबंदी’ची नाटय़संहिता फ्रान्समधील व्यावसायिक नाटकवाल्यांपर्यंत पोहोचली.
‘केली’ या संस्थेच्या निमंत्रणावरून एलकुंचवार ६ ते २२ नोव्हेंबर या काळात पॅरिसमध्ये वास्तव्यास होते. त्यांना जगप्रसिद्ध सोरबोन्न विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाने भारतीय नाटकांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले. एलकुंचवारांचे भारतीय नाटकांवर १२ नोव्हेंबरला भाषण झाले. फ्रेंच विद्यार्थ्यांनी एलकुंचवार यांच्याशी संवाद साधला. नंतर १६ नोव्हेंबरला पॅरिसमधील व्यावसायिक नटांनी ‘वाडा चिरेबंदी’चे नाटय़वाचन निमंत्रित प्रेक्षकांपुढे केले. याला रसिक प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. याविषयी एलकुंचवार म्हणाले, विभक्त कुटुंब व्यवस्थेची सवय लागलेल्या देशांमध्ये नाती जपली जात नसतील परंतु, माणसे सर्वत्र सारखीच आहेत. चांगली, वाईट, स्वार्थ विसरून संकटात सापडलेल्याच्या मदतीला धावून जाणारी.. कुटुंब व्यवस्था ढासळली असेल, शिल्लक राहिली नसेल तरी नात्यांशी स्वत:ला जोडून बघण्याची मानवी भावना अजून संपलेली नाही..     

विभक्त कुटुंब व्यवस्थेची सवय लागलेल्या देशांमध्ये
 नाती जपली जात नसतील परंतु, माणसे सर्वत्र सारखीच आहेत. चांगली, वाईट, स्वार्थ विसरून संकटात सापडलेल्याच्या मदतीला धावून जाणारी.. कुटुंब व्यवस्था ढासळली असेल, शिल्लक राहिली नसेल तरी नात्यांशी स्वत:ला जोडून बघण्याची मानवी भावना अजून संपलेली नाही..     
– महेश एलकुंचवार

First Published on December 27, 2012 3:52 am

Web Title: french theater opened for wada chirebandi