उरण : पावसाळ्यात मांसाहारी मंडळींकरिता बोंबील ही मेजवानी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळी बाजारात या हंगामातील बोंबील अगदीच थोडय़ा प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. नगाला ४० रुपये अशी त्यांची विक्री होत असल्याने मासळीप्रेमी अवाक झाले आहेत.

बोंबील पावसाळ्यातच मोठय़ा प्रमाणात मिळत असल्याने त्याचा आस्वाद याच काळात घेतला जातो. ही मासळी कोकणी माणसाचे आवडते खाद्य. जून महिन्यापासून पावसाळी मासेमारीवर बंदी घालण्यात येते. त्यामुळे मासळीची आवक घटते. सध्या इतरही मासळी उपलब्ध नसल्याने नव्या हंगामात आलेल्या बोंबील माशांचे दर वाढलेले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत बोंबलांचे दर एका नगाला २० रुपये होते. ते यंदा दुप्पट झाल्याची माहिती मासळी खवय्ये नितीन पाटील यांनी दिली. हंगामातील पहिले बोंबील खाण्याची इच्छा असतानाही दरवाढीमुळे ते खाता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

बोंबिलाचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. त्यांचे प्रमाण कमी असल्याने आम्हाला चढय़ा दराने बोंबील खरेदी करावे लागतात आणि वाढीव दराने त्यांची विक्री करावी लागते. हळूहळू आवक वाढल्यानंतर सर्वसामान्यांच्या आवाक्यातही बोंबील येतील. येत्या काही दिवसांतच मासेमारीवरील बंदी उठणार असल्याने त्यानंतर बोंबिलाचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे.

– कुंदाबाई कोळी, मासेविक्रेत्या