परभणी बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डात शुक्रवारी (दि. १४) सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे. हिशेबपट्टीतून केवळ हमालीचे सहा रुपये प्रतििक्वटल कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती गणेश घाटगे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी कापूस ओला न आणता स्वच्छ स्वरूपात विक्रीस आणावा. चांगल्या आणि खराब प्रतीचा कापूस वेगळा आणल्यास बाजारभावाबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही. त्यामुळे कापसास जास्तीतजास्त भाव मिळेल, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने या वर्षी वाहन प्रवेशशुल्क, वाहन वजनशुल्क, तुलाई व वराईची रक्कम बंद करण्यात आली आहे. मालमोटार व आयशर वाहन यांना मात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
मार्केट यार्डावर लिलावात संबंधित शेतकऱ्यांनी त्याबाबतची सौदा पट्टी घेऊनच जििनगवर आपली वाहने घेऊन जावीत. ही वाहने मार्केट यार्डात दुपारी एकपर्यंत आणावीत. उशिरा येणाऱ्या वाहनातील कापसाचा लिलाव त्या दिवशी होण्यास अडचण येईल, असे समितीने कळविले आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती गणेश घाटगे, उपसभापती आनंद भरोसे, सचिव सुरेश तळणीकर आदींनी केले आहे.