जंगलांसह कृषिक्षेत्राचाही वापर; संवर्धनास उपकारक

नागपूर : भारतातील वाघांचे संचारमार्ग हे आता जंगलांपुरतेच मर्यादित राहिले नाही तर त्यापलीकडे जात वाघांनी त्यांचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रामुख्याने विदर्भातील ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र वाघांच्या हालचालीसाठी अनुकूल ठरले आहेत. यातून वाघांच्या दीर्घसंवर्धनाची आशा निर्माण झाली आहे.

वाघांचे विदर्भाच्या जमिनीवरील भ्रमणमार्ग यावर भारतीय वन्यजीव संस्था आणि महाराष्ट्र वनखात्याने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, सुमारे ३७ हजार ०६७ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या संरक्षणाचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे.

या अभ्यासानंतर संरक्षित क्षेत्राबाहेरही वाघांच्या भ्रमणमार्गाचे जाळे विस्तारल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे ९७ हजार ३२१ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ३७ हजार ०६७ क्षेत्र वाघांचे भ्रमणमार्ग म्हणून ओळखले गेले आहेत. यात ३३१ वाघांची आश्रयस्थाने आहेत. ज्याठिकाणी वाघांचे भ्रमणमार्ग उत्तम आहेत, त्याठिकाणी उच्च व्याघ्रभ्रमंती आढळली. ज्याठिकाणी भ्रमणमार्ग कमी आहेत, त्याठिकाणी व्याघ्रभ्रमंतीत कमतरता आढळली. आता हे क्षेत्र भ्रमणमार्ग व्यवस्थापन योजनेअंतर्गत आणण्याचे आणि ते वृद्धिंगत करण्याचे मोठे आव्हान वनखात्यासमोर आहे.

अभ्यासाचा फायदा..

या अभ्यासातून मानव-वन्यजीव संघर्षांचे व्यवस्थापन, भ्रमणमार्गाचे संरक्षण आदी गोष्टींवर वनखात्याने आता अधिक जागरुक राहून लक्ष देण्याची गरज असल्याचे लक्षात येते. त्यासाठी खात्याला स्थानिक लोक, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वयंसेवी संस्था, विविध विकास संस्था यांनाही वनव्यवस्थापनात जूळवून घेण्याची गरज आहे.

भ्रमणमार्गाचे पाच भागांत विभाजन

या अभ्यासाकरिता वाघांच्या भ्रमणमार्गाचे पाच भागात विभाजन करण्यात आले. यात अत्यंत कमी म्हणजेच १० हजार २८९ चौरस किलोमीटर, कमी म्हणजेच १८ हजार ७२८ चौरस किलोमीटर, मध्यम म्हणजेच पाच हजार ६९० चौरस किलोमीटर, उच्च म्हणजेच एक हजार ४१८ चौरस किलोमीटर आणि अतिशय उच्च म्हणजेच ९४२ चौरस किलोमीटर असे वर्गीकरण करण्यात आले.

जंगलातील तयार जोडमार्ग (कॉरिडॉर) किं वा पूर्वीच्या अभ्यासानुसार किमान जोडमार्गापलीकडे वाघाने त्याचे क्षेत्र विस्तारले आहे. या अभ्यासानुसार विदर्भातील ग्रामीण भाग अजूनही वाघांच्या हालचालीसाठी अनुकू ल आहे. या जोडमार्गाची देखरेख करणे आता अत्यावश्यक आहे.

-डॉ. बिलाल हबीब, वैज्ञानिक, भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून.

निष्कर्ष..  विदर्भातील वाघ संरक्षित क्षेत्राबाहेरील क्षेत्र वापरत आहेत आणि त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. कृषी जमिनीवर वाघांच्या हालचाली होत आहेत. येथील सुमारे ८४ हजार २०२ किलोमीटरचे रस्ते विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे वाघ जेथून रस्ता ओलांडतात, तेथे उपाययोजना आवश्यक आहेत.