करोना संसर्गजन्य आजार असल्यानं सरकारनं विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, मागील चार दिवसात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळजीची बाब म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत.

देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या शुक्रवारी (८ मे) ५६ हजारांवर पोहोचली आहे. करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. लॉकडाउनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्याचा अनुकूल परिणाम गेल्या महिनाभराच्या आकडेवारीतून दिसून आला होता. करोनाच्या प्रसारावर परिणाम झाल्याचं निरीक्षण अभ्यासातून दिसून आलं होतं. मात्र, मागील चार दिवसांच्या आकडेवारीनं नवं आव्हानं सरकारसमोर उभं राहिलं आहे.

३ ते ६ मे या चार दिवसांच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या संख्येनं उसळी मारल्याचं दिसून आलं. या चार दिवसांमध्ये तब्बल दहा हजार जणांना करोना झाल्याचं समोर आलं. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली. यात सात राज्यांमध्ये ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १२ टक्क्यांनी जास्त

“मुंबईतील परिस्थिती काळजी करण्यासारखी झाली आहे. देशात १२,७६,७८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ५०००० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. म्हणजे देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण सध्या ३ टक्के आहे. दुसरीकडं मुंबईत ७३ चाचण्या करण्यात आल्या असून, ११००० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणजेच मुंबईतील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.