“पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्याची सेवा सुरु होईल. ती परवानगी देत आहोत” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

‘फक्त वृत्तपत्र घरपोच पोहोचवणाऱ्या मुलांनी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. सॅनिटाय़झर जवळ बाळगले पाहिजे’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर घरपोच वृत्तपत्र पोहोचवण्यावर बंदी घालण्यात आली होती. ‘यापुढे जे सुरु करु, ते पुन्हा बंद करणार नाही. महाराष्ट्रापासून देशाला आदर्श घेऊं दे’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“सध्या आपण करोनाच्या पीक म्हणजे सर्वोच्च बिंदूच्या जवळ आलेलो आहोत. काही काळ करोना रुग्णांचा आकडा वरती-खालती होऊन नंतर खाली येईल. बंधने पाळली तर करोना रुग्णांची संख्या कमी होईल” असे उद्धव ठाकरे म्हणाले. गरज नसेल तर बाहेर पडू नका. आपल्यापासून वडिलधाऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.