लॉकडाऊ नच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यत सुमारे ९० हजार लोक आले असून त्यांनी विनाकारण बाहेर फिरू नये म्हणून गावपातळीवर नेमलेल्या प्रतिनिधींमार्फत प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये दिली.

जिल्हाधिकारी मिश्रा,  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी गुरुवारी ‘’फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

जिल्ह्यतील पहिला करोनाबाधित रुग्ण पूर्णत: बरा झाला आहे. इतर दोन रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची स्थिती सुधारत आहे. खेड येथील रुग्णाकडून वेळीच माहिती दिली असती तर त्याच्यावरही वेळीच उपचार झाले असते, असे नमूद करून जिल्हाधिकारी म्हणाले की,  विदेशातून आलेल्या लोकांना स्वत:हून घरात अलग राहण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर, परराज्यातील सुमारे १९ हजार लोक जिल्ह्यत विविध लोकांकडे कामानिमित्त आलेले आहेत. त्यात गुजरात-कर्नाटकपासून अन्य राज्यातील लोकांचा समावेश आहे.  त्यांना जेवण किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना ते काम करत असलेल्या मालकांना दिल्या आहेत. तसेच अशा निराधार लोकांना जेवण,  निवास व्यवस्था देण्यासाठी जिल्ह्यात  १५१ निवारा गृहे  शासनाने केली आहेत.

खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली सेवा सुरु ठेवायची आहे. मात्र ताप, सर्दी,  खोकल्याचे रुग्ण आले तर त्यांची माहिती,  पूर्व  इतिहास तपासावा. करोनाशी निगडित संशय वाटल्यास त्याला तत्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठवावे. तसेच रुग्ण तपासताना स्वत: वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. करोनाशी निगडित रुग्ण वाढल्यास सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय ‘करोना रुग्णालय’ म्हणून परिवर्तित केले जात आहे. तेथे ४०० व्यवस्था होऊ  शकते, तर जिल्ह्यत १३०० खाटा उपलब्ध आहेत, अशीही माहिती मिश्रा यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यतील परिस्थिती कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. लोकांनी  सहकार्य केले तर ती अशीच राहील. दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले.