News Flash

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर शिवसेनेची टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आजपासून ३६ तासांचा भारत दौरा सुरु होत आहे. दरम्यान, शिवसेनेने या दौऱ्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प-उद्धव ठाकरे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आजपासून ३६ तासांचा भारत दौरा सुरु होत आहे. दरम्यान, शिवसेनेने ट्रम्प यांच्या या दौऱ्याचे स्वागत केले असले तरी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा हा व्यापारवाढीसाठी आहे त्यामुळे त्यांच्या इथं येण्याने भारतातील गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. ही परिस्थिती बदलण्याबाबत ट्रम्प चर्चा करणार असतील तर त्यांनी देवाण कमी आणि घेवाण जास्त करावी. त्यामुळे रुपयाला बळकटी येईल, असे शिवसेनेने सुचवले आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे देशात कमालीची उत्सुकता असल्याचे खरे नाही. जगात फौजदारी मिरवणाऱ्या एका देशाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी यापूर्वीच भारत भेटीदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापारावर चर्चा करणार असल्याचे जाहीर केल्याने ते केवळ त्यांच्या फायद्यासाठी येणार आहेत. त्यांच्या येण्याने देशातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कुठलाही फरक पडणार नाही. ट्रम्प यांचा केवळ अहमदाबाद आणि दिल्ली दौरा असल्याने देशातील जनतेला त्यांची उत्सुकता आणि कौतुकाचा प्रश्नच येत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

उत्सुकतेपेक्षा लपवाछपवी जास्त
ट्रम्प यांच्या भारतातील आगमनानिमित्त अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले आहेत. तिथल्या झोपड्या दिसू नयेत म्हणून त्याभोवती भिंती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या आगमनाच्या उस्तुकतेऐवजी लपवाछपवीच जास्त सुरु आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

सीएए, एनआरसी, शाहीन बागवर भाष्य नको
भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या संकोचावर ट्रम्प बोलतील असे माध्यमातील वृत्तांमधून म्हटले आहे. मात्र, त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) आणि शाहीन बाग या मुद्द्यांवर न बोललेलंच बर. कारण हे आमचे अंतर्गत मुद्दे आहेत. यातून इथलेच राज्यकर्ते मार्ग काढतील. याबाबत आम्हाला बाहेरच्यांच्या मार्गदर्शनाची गरज नाही, अशी भुमिकाही शिवसेनेने मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 8:21 am

Web Title: from trumps visit will not make much difference in the lives of ordinary people says shiv sena aau 85
Next Stories
1 दोन वर्षांपासून दीडशेंवर मृतांच्या अवयवांचे नमुने पडून
2 ‘सीएए’च्या निषेधार्थ ‘कफन ओढो’ आंदोलन
3 सरकार योजना बंद करण्यातच व्यस्त
Just Now!
X