सोनोग्राफी तपासणी व अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेवर मोर्चा नेऊन अनुक्रमे जिल्हाधिकारी अनिल कवडे व मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्याच्या पुष्टय़र्थ शहरातील डॉक्टरांनी आज बंदही पाळला. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्यांच्या अनुषंगाने डॉक्टरांमध्ये असंतोष आहे. या चाचण्या करणे हा गुन्हा आहे, याचे डॉक्टरांना पूर्ण भान आहे. त्या करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशीच संघटनेची भूमिका आहे. या व बेटी बचाव मोहिमेतही डॉक्टरांचा सक्रिय सहभाग आहे. असे असताना सोनोग्राफी किंवा अन्य फॉर्म भरण्यातील किरकोळ त्रुटींवरून सरकारी यंत्रणांकडून होणारी कारवाई अन्यायकारक आहे. अशा किरकोळ चुकांवरून डॉक्टरांना अटकही केली जाते. या राक्षसी कायद्यात तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकारही वाढले आहेत. याबाबत राज्य सरकारने सन २०१० मध्ये कायदाही केला. मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. यात डॉक्टरांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातही सुधारणा होणे गरजेचे असून त्यादृष्टीने कठोर पावले उचलावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास जोशी, सचिव डॉ. मिलिंद पोळ, राज्याचे उपाध्यक्ष डॉ. निसार शेख, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र सोमाणी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात महिला डॉक्टरही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
इशारा, धमकी आणि शहाजोग सल्ला!
याच निवेदनात संघटनेने डॉक्टरांच्या अनधिकृत बांधकामांचाही उल्लेख केला आहे. राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध मनपाने जाऊ नये असा गर्भित इशाराच संघटनेने दिला आहे. याबाबत मनपाने सुरू केलेली कारवाईसुद्धा डॉक्टरांच्या संघटनेने चुकीची ठरवली आहे. मनपाने केवळ रुग्णालयांच्याच बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातून एकतर्फी कारवाईची चिन्हे दिसतात, मात्र आमची रुग्णालये अनधिकृत ठरवल्यास आम्ही ती बंद करू अशी धमकीही या मंडळींनी दिली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना त्रास होईल, असे निर्णय घेऊ नयेत, असा शहाजोग सल्लाही या निवेदनात देण्यात आला आहे.