राज्यात विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासापूर्वीचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागत होता. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे. प्रवशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्टमधून सूट देण्यात आली आहे. त्याऐवजी करोना लसीचे दोन डोस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. “ज्या प्रवाशांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज नाही. मात्र त्यांच्याकडे दोन डोस घेतल्याचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे.”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असं असलं तरी करोनाचा धोका पाहता राज्यात करोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.

…म्हणून राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ!

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारांना करोनाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गरज पडल्यास पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा देखील सल्ला दिला आहे. राज्य सरकारने मात्र निर्बंधांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली आजची आकडेवारी काहीशी चिंतेत भर घालणारी ठरली आहे. कालच्या तुलनेत आज दिवसभरात राज्यात नोंद झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा जवळपास १ हजार रुग्णांनी जास्त आहे. मंगळवारी राज्यात ७ हजार २४३ रुग्ण सापडले होते. आज हा आकडा ८ हजार ६०२ पर्यंत गेला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा आकडा ६१ लाख ८१ हजार २४७ इतका झाला आहे.