X

रश्मी वहिनींच्या साबुदाणा खिचडी आणि वड्यामुळे युतीची दिलजमाई : मुख्यमंत्री

अभिनेता रितेश देशमुखच्या प्रश्नावर फडणवीसांचं दिलखुलास उत्तर

हो-नाही म्हणता म्हणता अखेर शिवसेना आणि भाजपामध्ये येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी युती झाली. युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी(दि.20) मुंबईत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या यशस्वीपणे झालेल्या युतीबाबत एक मिश्कील विधान केलं, आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. या मुलाखतीत रितेशच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. अनेक खडतर प्रश्न विचारत रितेशने मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण त्या सर्व प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी तितकीच सफाईदारपणे उत्तरं दिली. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सामनातून भाजपावर जोरदार टीका केली गेली, पण आता युती झाली आहे असा पहिला प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देशात असंगाशी संग करण्याची पद्धत आली आहे…सध्या जे एकमेकांचे चेहरेही पाहत नव्हते ते आता एकत्र येत हात वर करत आहेत…पण आमचं तसं नाहीये आम्ही जन्मभर एकमेकांचे चेहरे पाहिले आहेत… चांगल्या काळात आणि वाईट काळातही…त्यामुळे मला काहीच वेगळं वाटत नाही. हो… काही गोष्टींवर मतभेद होते पण व्यापक हिताकरता मतभेद दूर केले आणि महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलो असं मुख्यमंत्री म्हणाले.

यानंतर युतीची दिलजमाई अखेर कशीकाय झाली असा प्रश्न रितेशने विचारला. त्यावर उत्तर देताना, आम्ही मातोश्रीमध्ये गेल्यानंतर रश्मी वहिनींनी जी साबूदाणा खिचडी आणि वडा खाऊ घातला. जे पदार्थ त्यांनी खाऊ घातले त्यानंतर बोलायला काही जागाच उरली नव्हती…तेव्हाच दिलजमाई झाली असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर कार्यक्रमात उपस्थित उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंसह सर्वांमध्ये जोरदार हशा पिकला. या कार्यक्रमात नितीन गडकरी किंवा शरद पवार यांच्यापैकी कोण मराठी पंतप्रधान होईल असं मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं, त्यावर 2019 आणि 2024 वर्ष तर आधीच बूक झालं आहे, पण मराठी पंतप्रधानाबाबत 2025 मध्ये चर्चा करु असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिलं. सत्ता आल्यास उप मुख्यमंत्री कोण होणार या फ्रश्नाच्या उत्तरावर योग्यवेळी निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, 2014 मध्ये 63 जागांवर जिंकूनही शिवसेनेला यंदाच्या विधानसभेसाठी 144 जागा का दिल्या असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर, प्रत्येक पक्षाला आपण सगळ्या जागा लढाव्यात असं वाटतं. पण राजकीय वास्तवीकता नावाची गोष्ट असते जेव्हा विविध पक्ष एकत्र येतात त्यावेळी दोन पावलं त्यांनाही आणि आम्हालाही पुढे-मागे जावं लागतं. एकेकाळी आम्ही 117 जागा आणि ते 171 जागा लढायचे. राज्यासाठी जे चांगलं असेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या मनात इच्छा होती दोन पक्ष एकत्र यावेत. आता कार्यकर्ते खूश आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यासह पुण्यातील रिकाम्या खुर्च्या असलेली सभा आणि घरात पत्नी अमृता फडणवीस आधी माफी मागतात की तुम्ही अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं फडणवीसांनी दिली.