केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत. राज्य सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वजनदार नेते चंद्रकांत पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत. मात्र जळगाव महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीसाठी भाजपच्या नगरसेवकांना दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागत आहेत. २५ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून भाजपचे आमदार, सर्व नगरसेवक नाराज आहेत. नाराज नगरसेवक राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असून त्यांनी पक्षाकडे महापालिकेसमोर उपोषण करण्याची परवानगी मागितल्याने वाद चिघळला आहे. त्यास गिरीश महाजन यांचे वरवरचे, सोईस्कर राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जळगाव महापालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. अनेक अडथडय़ांची शर्यत पार करत निधी वाटपासाठी दोन वर्षांनंतर मुहूर्त लाभला. सध्या महापालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे सर्वाधिक ३२ नगरसेवक आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे १६, मनसे १२, राष्ट्रवादी ११, जनक्रांती दोन, महानगर विकास आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. राजकीय तडजोडींमुळे चालू पंचवार्षिकच्या शेवटच्या वर्षांत खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्यावर मनसेकडे महापौरपद आहे. मनसेचे महापौर ललित कोल्हे आणि गिरीश महाजन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आपला मित्र धर्म निभावत महाजन यांनी कोल्हे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी मिळवून देण्यास मदतदेखील केली. मात्र वेळोवेळी जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना डावलण्यात आले. भोळे हे खडसे गटाचे मानले जात असल्याने महाजन त्यांना चार हात लांबच ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. यामुळे २५ कोटी रुपयांचा निधी वाटप करताना भोळे यांच्या सूचनांकडे पालकमंत्र्यांनीही सोईस्कर कानाडोळा केला. निधीचे असमान वाटप झाल्यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. यात आ. भोळेंच्या भूमिकेबद्दलही भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कामांची अंतिम यादी आपणास दाखवली नसल्याचा दावा आमदारांनी करत समान निधी वाटप झाले नसल्याचे खापर ‘खाविआ’वर फोडण्यात आले आहे. ‘खाविआ’ने कामांची निवड करताना सगळ्यांना समान निधी वाटप करण्याची अपेक्षा होती; परंतु भाजपच्या नगरसेवकांना यात टाळण्यात आले आहे.

खाविआला कामेच होऊ  द्यायची नसल्याचे दिसते. भाजपला कामांचे श्रेय मिळू नये म्हणून हा सर्व खटाटोप आहे. वास्तविक हा निधी भाजपने मिळवला आहे. आता प्रस्ताव मंजूर होऊन कामे सुरू होणे गरजेचे आहे, असे भोळे यांचे म्हणणे आहे. या विषयावरून भाजपच्या नगरसेवकांची नाराजी वाढत असल्याने पक्षाच्या कार्यालयात त्यांची तातडीची बैठकदेखील घेण्यात आली. बैठकीत भाजप नेत्याने दिलेला निधी भाजपच्या नगरसेवकांच्याच प्रभागात वापरला जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. भाजप नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार नसल्याने गटारींची यादी रद्द करावी अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करण्याची परवानगी जिल्हाध्यक्ष या नात्याने आमदार भोळेंनी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यामुळे पक्षांतर्गत वाद चिघळला आहे. आधीच जिल्हा परिषदेत भाजपमध्ये दोन गट पडले असल्याने त्याचा फटका पक्षाला बसत आहे. वरणगाव नगर परिषद नगराध्यक्षपद निवडणूक, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, अमळनेर शेतकी संघ निवडणुकीच्या निमित्ताने आधीच भाजपची प्रतिमा डागाळली गेली आहे. महापालिकेतील या वादाचाही पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीसाठी भाजपच्या नगरसेवकांना दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागत आहेत. २५ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून भाजपचे आमदार, सर्व नगरसेवक नाराज आहेत.