जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी तासगावच्या मेळाव्यात सांगितले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
दानवे म्हणाले की, जिल्ह्याच्या पूर्व भागात पाण्याची परिस्थिती बिकट असून याठिकाणी प्रगती करायची असेल तर पाणी योजना पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. आघाडी शासनाने १५ वष्रे लोकांना केवळ पाण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. दिलेला शब्द पाळण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. यामुळे या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी ५० कोटींचा निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल.
भाजपामध्ये सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेहमीच सन्मान राखला जाईल, असे सांगून, कोणीही सत्तेसाठी भाजपामध्ये सहभागी होत नाही, तर नरेंद्र मोदी यांची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्यानेच भाजपात सामील होत आहेत. गेली ६० वर्षांहून अधिक काळ सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने प्रगतीच्या नावाखाली देशाला कंगाल केले आहे. देशाची प्रगती आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याची दृष्टी मोदींकडे असल्यानेच आजचा युवक आशादायी बनला आहे.
राज्य मंत्री मंडळाचा विस्तार करीत असताना जिल्ह्याला निश्चितच एक मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगत दानवे म्हणाले , एक खासदार,४ आमदार देणाऱ्या या जिल्ह्याला सत्तेत मानाचे स्थान देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहीलच, पण त्याचबरोबर पक्षवाढीसाठी आणि पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या कार्यकर्त्यांलाही काम करण्यासाठी संधी दिली जाईल.’
या वेळी प्रारंभी खा. संजयकाका पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी सिंचन योजना पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आग्रहाने सांगितले. या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ.प्रताप पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, कवठेमहांकाळचे माजी उपसभापती अनिल िशदे व दादासाहेब कोळेकर, कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हायुम सावनूरकर आदींसह काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.