व्यक्तीच्या मर्जीने करोनाचे बनावट अहवाल तयार करून विम्याची रक्कम लाटण्याचे प्रकार अमरावती जिल्ह्य़ात समोर आले आहेत. याच टोळीशी संबंधित एका विमा एजंटची ध्वनिफीत सर्वत्र प्रसारित झाल्याने या कथित गैरव्यवहार प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर आहे.

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अशा प्रकारची टोळी सक्रि य असल्याचा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेच्या सभेत के ला होता. या ध्वनिफितीमुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. ध्वनिफितीत विमा एजंट आपल्या सहकाऱ्याला विमा काढलेल्या काही विश्वासू युवकांची पाचसहा नावे सुचविण्याचा आग्रह करताना दिसत आहे. दुसरीकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनीही अशा प्रकारची काही प्रकरणे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त के ले आहे. एका संस्थेने त्यांच्याकडील काही कर्मचाऱ्यांचे करोना चाचणी अहवाल आमच्याकडे पाठवले, पण त्या कर्मचाऱ्यांची नावेच आमच्याकडे नाहीत, असे लक्षात आल्याचे डॉ. निकम यांचे म्हणणे आहे.

दरम्यान,  मोठय़ा प्रमाणावर अशा प्रकारची फसवणूक करणे शक्य नाही, एकदोन लोकांचे ते काम असू शकते, असे एका विमा प्रतिनिधीने सांगितले.  प्रकाश साबळे यांनी हा विषय उपस्थित के ल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू के ली आहे, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तथ्य असेल, तर निश्चितपणे कारवाई के ली जाईल, हे स्पष्ट के ले आहे. भाजपने देखील या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

प्रकरण काय?

अमरावती जिल्ह्य़ात अशा प्रकारच्या सुमारे १२ ते १३ विमा कंपन्या कार्यरत असून त्यांनी तीन महिने ते वर्षभराच्या मुदतीचे हप्ते पाडून ग्राहकांसमोर तशा योजना सादर केल्या.

विमा कंपन्यांच्या काही एजंटनी परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बनावट करोना अहवालाच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणे सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी दिली. यात मोठी टोळी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासगी प्रयोगशाळा, खासगी रुग्णालये आणि विमा एजंट यांच्या संगनमतातून हे प्रकार सुरू असून यात मोठय़ा प्रमाणावर सरकारी आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी लाभ मिळवून घेतला आहे.

हे सारे होते कसे?

प्रयोगशाळेतून एखाद्या कर्मचाऱ्याचा करोना सकारात्मक अहवाल तयार करायचा. त्यानंतर त्याने १४ दिवसांची बिनपगारी रजा घ्यायची. रुग्णालयात जाणून बुजून दाखल व्हायचे आणि विम्याची रक्कम मिळवायची, ती आपसांत वाटून घ्यायची,  अशा प्रकारची या टोळीची कार्यपद्धती आहे.

५.५ कोटीचे परतावे..

एका विमा कंपनीने जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या जुलैपासून आतापर्यंत सुमारे ५.५ कोटी रुपयांचे परतावे दिल्याची माहिती आहे. खुद्द आपल्याला एका प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याने करोना अहवाल सकारात्मक हवा की नकारात्मक, असे विचारण्यात आले होते, असा दावा प्रकाश साबळे यांनी केला.