जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा जिल्ह्यात गाजावाजा झाला, मात्र अनेक ठिकाणी तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय आयुक्तांनी लोहगाव येथील बंधाऱ्यास भेट देऊन निकृष्ट कामाबद्दल कंत्राटदारासह यंत्रणेला खडसावले. अखेर हाच बंधारा पावसामुळे फुटला. एकांबा व बोडखी येथील बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामामुळेही शेतकऱ्यांचे नुकतेच पेरलेले पीक वाहून गेले.
जूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३४.३७ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेला २०.१३ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे जलयुक्त शिवारांतर्गत विविध कामे घेण्यात आली. अनेक कामांच्या तक्रारी झाल्याने ११ व १२ जूनला उपविभागीय आयुक्त रेणापूरकर यांनी जिल्ह्यातील कामांची पाहणी केली. सुरुवातीला यंत्रणेकडून डिग्रस येथील काम दाखवण्यात आले. मात्र, केवळ चांगली कामे दाखवून निकृष्ट कामे लपवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत उपायुक्तांनी यंत्रणेची खरडपट्टी काढली. त्यानंतर २० लाख खर्चातून होऊ घातलेल्या लोहगाव येथील कामाला त्यांनी भेट दिली. तेथील निकृष्ट व अपूर्ण काम पाहून उपायुक्तांनी यंत्रणेसोबतच कंत्राटदाराला चांगलेच खडसावले.
या पाश्र्वभूमीवर बुधवारी जोरदार पावसामुळे लोहगाव येथील सिमेंट बंधारा फुटला. यास कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारण ठरला. बंधारा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची १० ते १५ एकर जमीन वाहून गेली. बंधाऱ्याच्या कामाच्या मर्यादाही यामुळे स्पष्ट झाल्या. िहगोली तालुक्यातील एकांबा पाझर तलावाचे पाणी शेतात शिरल्याने नारायण वसू या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. बोडखी बंधारा फुटल्यानेही िशदे कुटुंबातील ५० एकर जमिनीवरील पीक वाहून गेले. या दोघा शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.