महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या ९० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १ लाख १ हजार रुपयांचा निधी माणकुळे येथील शाळेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील यांनी शाळेतील मूलभूत आणि भौतिक सुविधांच्या विकासासाठी हा निधी स्वकष्टातील उत्पन्नातून उपलब्ध करून दिला आहे.

पल्लवी सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते माणकुळे येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र नारायण भोईर यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. या वेळी कोएसोचे कार्यवाह अजित शाह, संचालक अ‍ॅड. नंदा देशमुख, कोएसो प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या संचालिका शारदा धुळप, कोएसो मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य व विशेष प्रशासन अधिकारी डॉ. आशीष भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, कोएसो इंग्रजी माध्यम शाळा प्रशासन अधिकारी अनिता पाटील व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी मुख्यालयातील अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या अर्धपुतळ्याला सर्व उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.

ग्रामीण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवूनकोकण एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. आज संस्थेच्या १०० हून अधिक शाळा कोकणातील ग्रामीण भागात कार्यरत आहेत. संस्थेच्या जडणघडणीत अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आज संस्थेची वाटचाल सुरू आहे. ग्रामीण भागात शैक्षणिक विकासाचे वास्तवात उतरवलेले स्वप्न, भविष्यातदेखील अबाधित राहावे यासाठी दरवर्षी एका शाळेला १ लाख १ हजार रुपये स्वकष्टातील उत्पन्नातून देण्याचा संकल्प केला असल्याचे कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील यांनी या वेळी सांगितले.