चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी दुपारी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या चाहत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अंत्ययात्रेतही नगरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
अमरधाम स्मशानभूमीत दुपारी दीडच्या सुमारास अमरापूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या केतकी, रिमा व सायली यांच्यासह पुतणे प्रशांत यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. त्यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांपैकी अनेकांना रडू आवरता आले नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, खासदार दिलीप गांधी, नगरचे महापौर तथा आमदार संग्राम जगताप, राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप आदी या वेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास अमरापूरकर यांचे पार्थिव मुंबईहून नगरला आणण्यात आले. माणिक चौकातील त्यांच्या निवासस्थानी ‘अमरापूरकर वाडय़ा’त त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा यांच्यासह वरील नातेवाईक या वेळी उपस्थित होते. नाटय़क्षेत्रातील कलावंत, विविध क्षेत्रांतील नामवंत, नगरकरांनी येथे मोठी गर्दी केली होती. अमरापूरकर यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली होती. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी येथेच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले.
दुपारी साडेबारा वाजता येथूनच सजवलेल्या वाहनातून अमरापूरकर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वाहनाच्या पुढे व मागे अमरापूरकर यांची मोठी छायाचित्रे लावण्यात आली होती. कापड बाजार, तेली खुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा मार्गे अंत्ययात्रा अमरधाम स्मशानभूमीत पोहोचली. वाटेत ठिकठिकाणी अनेकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. खासदार गांधी, आमदार जगताप यांच्यासह नगरकर अंत्ययात्रेतही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.