News Flash

१५ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

पालघर जिल्ह्य़ातील १९७ अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेने सुरुवात केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांवर कारवाई सुरू

पालघर : पालघर जिल्ह्य़ातील १९७ अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेने सुरुवात केली आहे. या शाळांवर प्रत्येकी एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली असून या शाळा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये १५ हजार विद्यार्थी शिकत असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. १९७ शाळांपैकी सर्वाधिक शाळा वसई तालुक्यातील आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक) जिल्ह्यातील २३४ शाळांना अनधिकृत का ठरवू नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावून शासकीय मान्यता सादर करा अन्यथा शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर अनधिकृत शाळांची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करून पालकांनी अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू नये, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे या शाळा अनधिकृत असल्याचे फलक संबंधित शाळेच्या जवळ शिक्षण विभागाकडून लावण्यात आले होते. मात्र तरीही काही शाळा सुरू होत्या. अशा १९७ शाळांना जिल्हा परिषदेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही नोटीस तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत बजावण्यात आली असून दंडाची रक्कम वेळेत न भरणाऱ्या संस्थेवर अतिरिक्त दंड ठोठावण्यात येणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी सांगितले.

अनधिकृत शाळा

तालुका        शाळा

वसई             १५९

पालघर         १६

डहाणू            ३

तलासरी        ३

वाडा               ८

विक्रमगड       ४

जव्हार            १

मोखाडा           ३

जागेची समस्या

प्रत्येक शाळेच्या संस्थेकडे किमान एक एकर जागा असावी या अटीची पूर्तता होत नसल्याने अनेक शाळांना शासनाकडून परवानग्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे बांधकाम व वर्ग सुरू करण्याचे कृत्य अनधिकृत ठरत आहे. वसई आणि अन्य शहरी भागांमध्ये एक एकर जागेची सहज उपलब्धता होणे कठीण असल्याने त्या अनधिकृत ठरत आहेत.

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेने धडक मोहीम उघडली आहे. अनधिकृत शाळा बंद करण्याचा आपला प्रयत्न असून पालकांनी आपल्या पाल्यांना अशा अनधिकृत शाळांमध्ये पाठवू नये.

मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी, जिल्हा परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:51 am

Web Title: future of 15 thousand students in danger
Next Stories
1 दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मित्राचाच खून
2 प्रेयसीला जाळून मारल्याबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
3 साताऱ्यातील तीन बँकांना तिघांकडून १ कोटी ४१ लाखांचा गंडा
Just Now!
X