मुळा धरणातून आवर्तन सोडावे या मागणीसाठी आज नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर घोडेगावनजीक शनिशिंगणापूर चौफुल्यावर तब्बल तीन तास हजारो शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यासह सहा नेत्यांना अटक केली. त्यांनी जामीन नाकारल्याने नेवासे पोलीस ठाण्याच्या कोठडीत पाठविण्यात आले. जोपर्यंत आवर्तन सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत जामीन घेणार नसल्याचे गडाख यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता पाणीप्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता गडाख यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार पांडुरंग अभंग, लंघे, माजी सभापती कारभारी जावळे, रिपाइं नेते अशोक गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांच्यासह हजारो शेतकरी शनिशिंगणापूर चौफुल्यानजीक जमले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे महामार्गावर औरंगाबादकडे प्रवरा संगमपर्यंत नगरकडे पांढरीपुलापर्यंत वाहतूक खोळंबली होती. जोपर्यंत आवर्तन सोडत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला. त्यामुळे तहसीलदार हेमलता बडे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. सानप यांनी आंदोलनात मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही.
तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर माजी आमदार गडाख यांच्यासह सहा जणांनी अटक करून घेतली. त्यानंतर जमाव घोडेगाव येथून सोनई पोलीस ठाण्यात आला. ठाण्यासमोर हजारो शेतकरी ठिय्या देऊन बसले होते. या वेळी घोडेगाव येथील आबासाहेब सोनवणे या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात गडाख यांच्यासह १०० आंदोलकांवर रास्ता रोको, जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सायंकाळी गडाख, लंघे, मोटे, तुवर, भरत बेल्हेकर, सुनील गडाख यांना नेवासे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी निखिल गुप्ता यांच्या समोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर सहाही जणांनी जामीन नाकारला. त्यामुळे नेवासे पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत त्यांना ठेवण्यात आले.
पहिला तुरुंगवास
माजी आमदार गडाख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक आंदोलने केली. गुन्हे दाखल झाले. पण त्यांना अटक झाली नव्हती. त्यांचे विरोधक मात्र अनेकदा तुरुंगात गेले होते. आता गडाख यांना रास्ता रोको आंदोलनात पहिलीच अटक झाली. त्यातही त्यांनी जामीन नाकारला. त्यामुळे नेवासे पोलीस ठाण्यातील कोठडीत त्यांचा पहिलाच मुक्काम असेल.