गडचिरोलीत मुंगनेर- येनगावच्या जंगलात पोलीस चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. गेल्या २४ तासात तीन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

मंगळवारी मुंगनेर ते येनगावच्या जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांना जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यानंतर सुमारे दीड तास दोन्ही बाजूंनी चकमक सुरु होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये पोलिसांनी तीन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सोमवारी रानवाही जंगल परिसरातही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या भागात नक्षल्यांची गुप्त बैठक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सी-६० जवानांच्या एका पथकाने या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले होते. ही चकमकदेखील सुमारे तासभर सुरु होती. या चकमकीत एका महिला नक्षलवाद्याचा मृत्यू झाला होता. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन १२ बोअर बंदुक, पिट्टू आणि मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले होते.