नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. चौकशीसाठी या दोघांनाही गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे.
प्रा. वरवरा राव यांच्यासह नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग यांना गतवर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यातच होते. गडचिरोली जिल्ह्यात २०१६ मध्ये सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी ८० वाहने जाळली होती. यामध्ये जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती.
पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. ३१ जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. या दोघांना अहेरीच्या न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर या दोघांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 10:06 am