गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेल्या ७१ एसआरपीएफ जवानांचे करोना अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात ४२४ पैकी आत्तापर्यंत २८६ जवान करोनाबाधित आढळले आहेत.

या नवीन ७१ बाधितांमूळे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २५० झाली. तर एकूण रूग्णांची संख्या ४२४ झाली आहे. आत्तापर्यंत १७३ रूग्ण बरे झाले तर एकाचा मृत्यू झालेला आहे.

या अगोदर १८ जुलै रोजी गडचिरोलीत संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ७२ जवानांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर मुंबईहून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह सीआरीपएफ, एसआरपीएफ, आयटीबीपीच्या जवानांना देखील करोनाने आपल्या जाळ्यात खेचल्याचे दिसत आहे.