गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी दहा दिवस रजेवर होते. काल (शनिवार) जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांची सायंकाळी करोना चाचणी(RAT) करण्यात आली, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपचारा दरम्यान जिल्ह्यातील प्रशासकिय काम ऑनलाइन स्वरूपात सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करोनाबाबत कोणत्याही प्रकारची सध्यातरी त्यांना लक्षणे नसून कुटुंबातील इतर सदस्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

गडचिरोलीमध्ये काल ६२ नवीन करोनाबाधित आढळले, तर अॅक्टिव्ह करोना बाधितांपैकी १६ जण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये गडचिरोली येथील ८, सिरोंचा व धानोरा येथील प्रत्येकर दोन दोन तर वडसा, चामोर्शी, एटापल्ली, आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.यामुळे जिल्हयातील अॅक्टिव्ह करोनाबाधितांची संख्या ३७१ झाली असून, एकुण बाधित संख्या १ हजार ५६५ वर पोहचली आहे. एकूण १ हजार १९१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.