नक्षलवाद्यांत असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी पाऊल
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने नक्षलवाद्यांसाठी ३ डिसेंबपर्यंत नवजीवन योजनेंतर्गत आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे. ही आत्मसमर्पण योजना यापूर्वी राबवून बऱ्याच नक्षल्यांना आत्मसमर्पणास प्रोत्साहित करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्य़ात व शेजारच्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कार्यरत नक्षलवादी नेता, डिव्हिजन समिती सचिव, सदस्य प्लाटून दलम, दलम कमांडर, उपकमांडर, दलम सदस्यांनी गडचिरोली व अन्य जिल्ह्य़ात आत्मसमर्पण केले, तर काहींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. आत्मसमर्पित व अटक नक्षलांची विचारपूस केल्यावर काही पोलिस-नक्षल चकमकी दरम्यान प्राप्त झालेल्या साहित्य व अभिलेखावरून असे दिसून येते की, भाकम माओवादी या नक्षल ग्रुप मधील हालचालींमध्ये अस्थिरता असल्याचे समजते. नक्षल चळवळीत असतांना कनिष्ठ सदस्यांची वरिष्ठांकडून होणारी पिळवणूक, महिलांवरील अत्याचार, विवाह पध्दती, संतती नियमन, हुकूमशाही वागणूक व ध्येयविहीत आदेश-निर्देशांमुळे कनिष्ठ सदस्यांमध्ये या चळवळीबाबत नाराजी आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर ते दलम सोडून पळत आहेत. यामुळे नक्षल सदस्यांना आत्मसमर्पणाचे आवाहन करून एक आदर्श नागरिक म्हणून समाजात मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने हा नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या अभियानादरम्यान गडचिरोली जिल्ह्य़ाचे अप्पर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व सी-६० च्या पोलिस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नक्षलवाद्यांमध्ये काम करणाऱ्या चिचोडा गावातील चातगाव एलओएस सदस्य शिवाजी उर्फ निलेश मडावी याच्या कुटुंबायांची अप्पर पोलिस अधीक्षकांनी भेट घेऊन या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली व कुटुंबाला साडी-चोळी, शर्ट-पॅंट कापड भेट दिले. यावेळी शिवाजीचे आई, काका, चुलत भाऊ, गावचे सरपंच, गाव पाटील, तसेच इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोतया नक्षलवाद्याला अटक
मरपल्ली या गावात तोतया नक्षलवादी शत्रू उर्फ सुरेशअण्णा दुर्गा दुर्गे या ३० वर्षीय तोतया नक्षलवाद्याला अटक करण्यात आली. शत्रू दुर्गे जिमलगट्टा संगम सदस्य होता, परंतु त्याने २००६ मध्ये आत्मसमर्पण केल्यावर तो आपल्या गावी कुटुंबीयांसोबत राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने आलापल्लीतून एक डांगरी खरेदी केली. ती घालून सुधागुडम गावात जाऊन तीन लोकांना बोलावून आपण नक्षलवादी असून आपले साथीदार जवळच जंगलात असल्याचे सांगून या तिघांपैकी संपत या गावकऱ्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे संपत यांनी म्हटल्यावर त्याने संपताच्या घराचे कुलूप तोडून झडती घेतली, पण त्यात त्याला काहीही सापडले नाही. यानंतर तो निघून गेला. आज या तिघांनी हा प्रकार व त्याचे वर्णन गावकऱ्यांना सांगितल्यानंतर शत्रू दुर्गे याला गावातील लोकांनी ओळखले. तो तोतया नक्षलवादी असल्याचे लक्षात आल्यावर मरपल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शत्रू दुर्गेविरुध्द जिमलगट्टा उपपोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli district police launch scheme of surrender form naxal
First published on: 30-11-2015 at 04:27 IST