काहींचा मृत्यू गोळी लागल्याने तर काहींचा पाण्यात बुडून; शवविच्ंछेदन अहवालातील धक्कादायक माहिती

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार झालेल्या ४० नक्षलवाद्यांपैकी २० जणांचे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाले असून त्यापैकी १२ जणांचा पोलिसांच्या गोळ्या लागल्याने झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला. तर उर्वरित आठ पैकी चौघांचा मृत्यू गोळ्या न लागताही केवळ पाण्यात बुडून झाला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून पुढे आला आहे. यामुळे या चकमकीवरील संशयाचे धुके गडद झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात २२ एप्रिलला कसनासूर जंगलातील इंद्रावती नदीच्या परिसरात तर २३ एप्रिलला अहेरी तालुक्यातील नैनतर परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्या मृतदेहांवर गडचिरोलीतील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यापैकी २० जणांचे अहवाल सात डॉक्टरांच्या चमूने सादर केले. त्यात इंद्रावती परिसरात मारल्या गेलेले १४ आणि अहेरी तालुक्यात मारल्या गेलेल्या ६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यापैकी बारा जणांची ओळख पटली आहे. त्यात साईनाथ ऊर्फ दोमेश मडी आत्राम, राजेश ऊर्फ दामा रायसू नारोटी, सुमन ऊर्फ जन्नी कुडियेती, नागेश ऊर्फ दुलसा कन्ना नारोटे, शांताबाई मंगली पदा, अनीता रामजी मडावी, नंदू ऊर्फ विक्रम बिच्छा आत्राम, लता वड्डे, क्रांती, कार्तिक उके, जयशीला गावडे यांचा समावेश आहे. तर उर्वरित नऊ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. यापैकी १२ जणांचा मृत्यू गोळ्या लागल्याने झाला आहे. त्यांच्या फुफ्फुस, डोके, छाती आदी  भागांवर गोळ्या लागल्याच्या जखमा आहेत  तर चार जणांना गोळया लागल्या असल्या तरी त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला आहे. मात्र, उर्वरित चार जणांचा मृत्यू एकही गोळी न लागता केवळ पाण्यात बुडल्याने झाला आहे. काही जणांच्या शरीरातून अधिक रक्तस्त्राव झाला असून काहींचे अवयव मगरी व माशांनी खाल्ले असावे, असेही अहवालात नमूद आहे. साईनाथच्या शरीरावर सहा गोळयांच्या जखमा आहेत. उर्वरित २० शवविच्छेदन अहवाल दोन दिवसांत तयार होतील, असे सूत्रांकडून समजते.