करोना टाळेबंदीत गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या ३६ पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यास कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या आज ऑनलाईन झालेल्या बैठकीत स्पष्ट शब्दांत नकार दिला. उलट भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एक्सपर्ट पॅनल’ नियुक्त करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच ही प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीनंतरच राबविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांच्या ३६ पदांच्या भरतीला काही संघटना व सिनेट सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. तर काही भरती प्रक्रिया झालीच पाहिजे या मताचे आहेत. कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळेच घाईने टाळेबंदीत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असाही काहींचा सूर आहे. करोनाच्या टाळेबंदीत भरती पक्रिया राबविली असल्याने वादग्रस्त ठरली आहे.

अशातच आज गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत बहुसंख्य सदस्यांनी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, कुलगुरू डॉ. कल्याणकर आणि सदस्य डॉ. मायी यांनी स्थगितीला स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला विद्यापीठाचा विकास करायचा असेल तर भरती प्रक्रिया राबवावीच लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. टाळेबंदीत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, त्यांच्या कागदपत्रांचे ११ सेट ३१ मेपर्यंत पोहचत नसतील तर त्यांना आपण वेळ देवू, त्यांची कागदपत्र ऑनलाईन अर्जावरून काढून घेवू, त्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करू असे कुलगुरू म्हणाले.

विशेष म्हणजे आज प्रत्येक विषयाचे ‘एक्सपर्ट पॅनल’ नियुक्त करण्याचा विषय एकमताने घेण्यात आला. प्रत्येक विषयासाठी सहा तज्ज्ञांची नावे दिली गेली. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही भरती राबविण्यात येणार आहे. टाळेबंदीमुळे सध्या कुठल्याही प्रकारच्या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. टाळेबंदीनंतरच भरती राबवू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोंडवनातील भरतीला स्थगिती द्या – वैद्य

गोंडवाना विद्यापीठात होवू घातलेल्या नोकर भरतीत ओबीसी वर्गासाठी एकही जागा रिक्त नसल्यामुळे आणि राज्यात नोकरभरती बंद असतांनाही ‘गोंडवाना विद्यापीठात’ होणारी ही भरती तत्काळ थांबवून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याातील ओबीसी संघटना व विद्यापीठाचे सिनेट सदस्यांच्या सोबत या नोकर भरतीबाबत चर्चा करून त्यानंतर ही नोकरभरती करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत केली आहे.