नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद अवघ्या दोन वर्षांचा राजकीय अनुभव असलेले राजे अंब्रीशराव महाराज यांच्याकडे सोपविण्यात आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच गडचिरोली मुख्यालयी न येता अहेरीच्या राजवाडय़ात बसून राजेशाही थाटात ते प्रशासनाची सूत्रे हलवित असल्याने अधिकाऱ्यांचे वर्तुळ चांगलेच संतापले आहे.
शंभर टक्के आदिवासी असलेला हा जिल्हा १९८० पासून नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळत असल्याने तो विकासात मागे पडला आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी, तसेच स्थानिक आदिवासींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता असतांना उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी या जिल्ह्य़ाचे पालकत्व स्वीकारले होते. त्यांच्या कार्यकाळात येथील अनेक प्रश्न मार्गी लागले. सत्तापरिवर्तनानंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आहे. भाजपची सत्ता येताच राज्यपाल सी.विद्यासागर राव व मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच दौरा गडचिरोलीचा केला. त्यांनी हा जिल्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्रीच या जिल्ह्य़ाचे पालकत्व स्वीकारतील, असे वाटत होते, परंतु त्यांनी ही कठीण जबाबदारी राजकारणात अतिशय नवखे अहेरीचे आमदार व आदिवासी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्याकडे सोपवली.   
 राजे अंब्रीशराव गडचिरोली मुख्यालयी न येता अहेरीच्या राजवाडय़ातून कारभार चालवित असल्यामुळे अधिकारी उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यालयातील अधिकाऱ्यांना राजवाडय़ावर वारंवार बोलावले जात असल्यामुळे ही नाराजी अधिकच वाढत आहे. राजे विश्वेश्वरराव, राजे सत्यवान आत्राम, अशा कर्तबगार राजकीय घराण्याचा वारसा लाभला असूनही राजे अंब्रीश यांच्यात जिल्ह्य़ातील समस्या व प्रश्न सोडविण्याचे गांभीर्य दिसत नाही.
पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा ते गडचिरोलीत आले. त्यातही एकदा मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला, तर दुसऱ्यांदा स्वत:च्या स्वागत सोहळ्याला. अकाली पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तेव्हा पालकमंत्री दिसलेच नाहीत. त्यांनी केवळ अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. सिरोंचा येथे सत्कार सोहळ्यानिमित्त त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना फटाके व ढोलताशे बदडण्यात आले. वैद्यकीय सेवेअभावी दोन जुळ्यांचा बळी घेणाऱ्या या आरोग्य केंद्रात जाण्याची तत्परताही त्यांनी दाखवली नाही. क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनाला  दीड तास उशिरा आले, ग्रंथमहोत्सवाला  गैरहजर राहिले, एटापल्लीच्या सत्कार सोहळ्याला त्यांनी पाठ दाखवली.
मुंबई-नागपूर-अहेरी प्रवास
पालकमंत्री असल्याने अंब्रीशराव यांनी विविध विभागांचा आढावा घेण्याची आवश्यकता होती. पालकत्वाची सूत्रे स्वीकारताच पोलिस दल व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाच वर्षांचा विकास कामांचा आराखडा तयार करण्याची गरज होती. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक नाहीच. फक्त मुंबई-नागपूर-अहेरी असा त्यांचा प्रवास सुरू आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी