गडचिरोली:भामरागड उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणा-या कोठी पोलीस मदत केंद्र येथे किराणा सामान आणन्यासाठी दुकानात गेलेल्या दोन जवानांवर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारात एक पोलीस जवान शहीद झाला असुन दुसरा जखमी झाला आहे. आज शनिवारी सकाळी 8 ते 8.30 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुशांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव आहे. तर दिनेश भोसले नामक जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही जवान कोठी येथे सकाळी 8 वाजताच्या सुमारास किराणा सामान आणन्यासाठी दुकानात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोघांवरही अचानक गोळीबार केला यात दुश्यंत मृत्युमुखी पडला गोळीबारानंतर नक्षलवादी पळून गेले. सदर किराणा दूकान पोलीस मदत केंद्रापासुन केवळ 200 मीटर अंतरावर असल्याचे कळते.

नक्षलवाद्यांची सुद्धा एक रैपिड एक्शन टीम आहे. ती गुप्तपणे पोलीसांची व त्यांच्या रडारवर असलेल्या राजकिय व अन्य नागरिकांची रेकी करून हल्ले करीत असल्याच्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशाच एका टीमने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नक्षल्यांनी हा हल्ला करून जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसुन येत आहे.