तेंदूपत्ता हंगाम सुरू असतांना नक्षलवाद्यांना मिळणारी खंडणी पोहचविणाऱ्या तेंदू कंत्राटदाराच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केल्याने चिडलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल मंगळवारी(ता.९)रात्री गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची जाळपोळ करुन, दोन वनरक्षकांना बेदम मारहाण केली.या घटनेमुळे परिसरात भिती व दहशतीचे वातावरण आहे.

तेंदू हंगामामुळे गडचिरोलीत सध्या तेंदू कंत्राटदाराचा राबता आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी नक्षलींना तेंदू कंत्राटदाराकडून पोहचणारी दोन कोटी पेक्षा अधिकची रसद पकडली होती. त्यानंतर तेंदूपत्ता कंत्राटदाराच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली. यासर्व प्रकारामुळे नक्षलवादी चांगलेच संतापले आहेत. एकीकडे करोनाच्या भितीमुळे नक्षलवादी जंगलात अडकून पडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक रसद पूर्णपणे बंद झाली आहे.

तेंदू हंगामात नक्षलवादी कोट्यावधी रूपये खंडणीच्या माध्यमातून गोळा करतात. मात्र, आता पोलिसांनीच खंडणीची रक्कम पकडल्याने नक्षलींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नक्षली चांगलेच संतापले आहेत. याच संतापात मंगळवारी रात्री १० ते १५ सशस्त्र नक्षलवादी वनपरिक्षेत्र कार्यालयात गेले. त्यांनी दोन वनरक्षकांना दमदाटी करुन कार्यालयातील काही कागदपत्रे व फर्निचरला आग लावली. त्यानंतर नक्षली दोघांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल घेऊन गेले. रात्रीच दोन्ही वनरक्षकांना आलापल्ली येथे आणण्यात आले. सद्या तेंदूपानांचा हंगाम सुरु आहे. अशावेळी नक्षल्यांनी वनरक्षकांना मारहाण केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी नक्षलींनी हे वनपरिक्षेत्र कार्यालय जाळले होते. त्यानंतर मंगळवारी पून्हा जाळण्यात आले. वन विभागाच्या कामांना विरोध म्हणून ही घटना केल्याचे बोलले जात आहे. नक्षलींच्या गट्टा जांबिया दलमकडून हा प्रकार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.