News Flash

करोना विरोधी लढाईचा गडचिरोली पॅटर्न!

गावात परत आलेल्यांना घरात अथवा शाळेत १४ दिवस विलगीकरणाखाली ठेवले जाते

डॉ. अभय बंग

– संदीप आचार्य

संपूर्ण गडचिरोलीत आज करोनाचा एकही रुग्ण नाही. याला दोन कारणं आहेत. यात येथील शंभर गावात ‘सर्च’ केलेले काम तसेच गावागावने बाहेरच्या लोकांना केलेली गावबंदी. त्याचप्रमाणे अजूनही येथील कोणीही करोनाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेला नाही. करोना विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी ‘सर्च’ने एक योजनाही तयार केली आहे.

मुंबई हे खरच ‘गेट वे ऑफ इंडिया’ आहे. करोनासाठीही ‘गेट वे’ ठरल्यामुळे मुंबईत आज सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मुंबईपासून दूर पार दुसऱ्या टोकाला गडचिरोली असल्यामुळे अजूनपर्यंत करोना येथे पोहोचलेला नाही. याचा अर्थ भविष्यात करोनाचा रुग्ण आढळणारच नाही, असा होत नाही. परंतु गडचिरोलीचा आदिवासी, ग्रामीण तसेच शहरी भाग जागरुक असल्याने करोनाला दूर ठेवण्यात यश आल्याचे विख्यात समाजसेवक डॉ अभय बंग यांनी सांगितले.

गडचिरोलीची लोकसंख्या सुमारे १२ लाख असून शहरी भागात राहाणाऱ्यांची संख्या दहा टक्के आहे. करोनाची माहिती येथे बऱ्यापैकी असल्याने ग्रामीण भागातील गावा गावात जागरुकता असून अनेक गावांनी आपल्या रस्त्यावर अडथळे निर्माण करून ठेवले आहेत. बाहेरील कोणीही व्यक्ती आल्यास त्याला गावाच्या वेशीवर अडवून त्याची चौकशी केली जाते. गावात येणाऱ्या बहुतेक व्यक्ती या गावांमधीलच असून कामाधंद्यानिमित्त ही मंडळी वेगवेगळ्या शहरात जातात. असे सुमारे १५ हजाराच्या आसपास लोक असून ज्या गावात ते परत येतात तेथे त्यांना गावात घेतले जाते मात्र एखाद्या घरात अथवा शाळेत त्यांना १४ दिवस विलगीकरणाखाली ठेवले जाते. या काळात त्यांना सर्दी ताप वा खोकला आदी लक्षणे दिसली नाही तर त्यांना घरी जाता येते. या काळात त्यांच्या जेवणाची व्यवस्था गाव करतं अथवा घरची मंडळी करतात असे डॉ अभय बंग यांनी सांगितले. येथील आदिवासी भागात करोनाविषयी विशेष माहिती नसली तरी काहीतरी मोठा आजार असून स्वच्छता पाळली पाहिजे ही जाणीव आदिवासींमध्ये दिसून येते.

आमच्या ‘सर्च संस्थे’ने येथील १०० गावांत सॅम्पल सर्वेक्षण केले. त्यात कोणत्याही गावात करोनाची संशयित व्यक्ती आढळून आली नाही. तसं पाहिले तर गावातील मुख्य उद्योग शेतीचा. सध्या फारसे काम नसल्याने गावकरी कॅरमसारखे बैठे खेळ खेळतात. यातून सोशल डिस्टंसिंग राहात नाही हे खरे असले तरी जिल्ह्यात करोनाबाबतच्या भीतीपोटी बऱ्यापैकी लोक काळजी घेतात. काही गावातील सरपंचानी नामी शक्कल शोधली आहे. गावातील महिला बचतगटांना कापडी मास्क बनविण्याचे काम दिले. यामुळे गावागावात मास्कचा वापर होत आहे. एक गोष्ट म्हणजे आरोग्यसेवा देण्यासाठी फारसे डॉक्टर नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रावरही डॉक्टर नसतात असे सांगून डॉ अभय बंग म्हणाले, आशा कार्यकर्त्या तसेच अधिपरिचारिका आदी गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. मास्कचे वाटप करत आहेत मात्र उपचाराच्या पातळीवर त्यांचा फारसा उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘सर्च’ने शंभर गावात जाऊन करोनाशी लढाई कशी करायची याची गावकऱ्यांच्या मदतीने तयारी केल्याचे डॉ बंग म्हणाले. गावागावात करोनाचा सामना करता यावा यासाठी आम्ही एक मॉडेल विकसित केले आहे. यात करोनाची मुळातच लागण होऊ नये याची काळजी घेणे व लागण झालीच तर त्याला अटकाव कसा करायचा याची तयारी असे दोन भाग केले आहेत. आज जरी येथे करोनाचा एकही रुग्ण नसला तरी भविष्यात करोना गडचिरोलीत येणारच नाही, याची खात्री देता येत नाही. ही करोना विरोधातील लढाई आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी योग्य तयारी करणे गरजेचे असून आम्ही तयार आहोत, असे डॉ अभय बंग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:11 am

Web Title: gadchiroli pattern to fight corona
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पंढरपुरात विक्रेत्यांची थर्मल चाचणी; ग्राहकांना वृत्तपत्रांची मागणी सुरु ठेवण्याचे आवाहन
2 देशातील १७० ‘हॉटस्पॉट’मध्ये मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे
3 Lockdown: नागपुरातील बेघरांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; तुकाराम मुंढेंनी सुरु केला उपक्रम
Just Now!
X