गोंडवाना विद्यापीठातील ३६ प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांच्या भरतीला अर्थ विभागाने आर्थिक कारणामुळे स्थगिती दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची ३६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात ओबीसी समाजासाठी एकही पद रिक्त नाही. तसेच बहुसंख्य संस्थांनी टाळेबंदीमुळे भरती प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी केली आहे. परंतु कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी स्थगितीला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत स्पष्ट नकार दिला होता.

वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेला राज्याच्या अर्थविभागाने स्थगिती दिली आहे. ३६ पदभरतीची फाईल अर्थ खात्याकडे गेली होती. परंतू, आर्थिककारणांमुळे ही फाईल परत पाठविण्यात आली तसेच भरती प्रक्रियेला स्थगितीही दिली गेली आहे. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांना यासंदर्भात माहिती नाही असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.