गडचिरोलीतील किष्टापूर नाल्यावरील वाहनांची जाळपोळ करणाऱ्या नक्षलींवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करता देचलीपेठा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतींकडून नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर केला गेला आहे आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी मोठ्या संख्येत ग्राम पंचायतींकडून नक्षल गावबंदी ठराव मंजूर झाला.

नक्षलवाद्यांनी मौजा किष्टापूर येथे ८ एप्रिल २०२० रोजी नाला पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. यावेळी या किष्टापूर नाल्याचा फायदा होणाऱ्या पंचक्रोशीतील अनेक ग्राम पंचायतींनी नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध् केला. किष्टापूर नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा फायदा या भागातील अनेक ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणार आहे. याची जाणीव ग्रामस्थांना आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील ग्राम पंचायतींचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे शालेय विद्यार्थी, मजूर व ज्या नागरिकांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे अशा नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद होते. एवढंच नाहीतर उपचाराअभावी मृत्यू होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाचे महत्व पंचक्रोशीतील नागरिक जाणून आहेत.

अशा स्थितीत नक्षलींनी कोणत्याही बाबींचा विचार न करता कामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्याचाच परिणाम २२ गावांनी गावबंदीचा ठराव मंजूर केला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे, यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच किष्टापूर नाल्यावरील बांधकाम तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना नवसंजीवनी देणारा पुल उभारावा असाही ठराव केला आहे. नक्षलींनी ग्रामस्थांचा वापर थांबवावा व विकासाच्या आड येवू नये, अशा शब्दात इशारा दिला आहे.  नक्षल गावबंदीचे ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून गावांच्या विकासासाठी ६ लाख रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान मंजूर करावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांनी ग्राम पंचायतींच्या नक्षल गावबंदीच्या ठरावाचे स्वागत केले आहे.