रस्त्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे गडचिरोली जिल्ह्यात एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी २३ किलोमीटर पायी प्रवास करून दवाखान्या जावे लागले. तर दुसरी एक महिला दवाखान्यात जाताना दगावल्याच्या घटना नुकत्याच गडचिरोलीत घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या चर्चेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रस्त्ये आणि पूलासाठी ५० कोटींची मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आज जिल्हयातील विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी करोनाबाधितांची विशेष काळजी घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केली. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ते गावस्तरावरील प्रत्येक प्रशासनातील व्यक्ती चांगले काम करीत आहे. ही स्थिती सुधारल्यानंतर या कामाचा गौरव करण्यात येईल. पंरतू आता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

पोलीस, आरोग्य विभाग आणि महसूल यांच्या कामगिरीमुळे करोनावर नियंत्रण मिळविण्यात जिल्ह्याला यश आले आहे. जिल्ह्यात सर्वचजण बाहेरुन आलेले व संस्थात्मक विलगीकरणातील आहेत. इतर जिल्हयाच्या तुलनेत जिल्ह्यात ९ हजार पाचशे कोविड तपासण्या झाल्या आहेत. जिल्हा क्रिडांगणाला २७ कोटी रूपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. रोजगार व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अद्यावत अभ्यासिका यावर्षी सुरु करण्याची तयारी झाली आहे. दोन वर्षात १० हजार रोजगार निर्मितीचे लक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

विद्यापीठाकडील उर्वरित ७० कोटी खर्च करण्यास परवानगी

गोंडवाना विद्यापीठाकडे शिल्लक ७० कोटी हे नवीन सुविधा निर्मितीसाठी खर्च करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या ३५ एकर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. या परिस्थितीत हा शिल्लक निधी खर्च करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी पायाभूत सुविधांसाठी हा निधी अजून १० ते १५ एकर जागा घेऊन खर्च करावा. ५० ते ६० एकर जागेत पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी शिल्लक निधीची परवानगी देवू असे त्यांनी यावेळी सांगितले.